“पाच महिने झाले…उत्तर अजूनही नाही; माझे बारामतीकर शांत का?”
काय रे बारामतीकरांनो… प्रश्न विचारायचे थांबवले का?
बारामतीकरांनो…
घाबरू नका. इथल्या प्रत्येक रस्त्यात मी दिसेल. इथल्या प्रत्येक वृक्षात मी दिसेल तुम्हांला, इथल्या प्रत्येक इमारतीत माझा घाम आहे. इथल्या प्रत्येक विकासकामात माझा सहभाग आहे. बारामतीत जे काही उभं आहे, त्यात माझं आयुष्य गेलं आहे. मी, माझे बारामतीकर आणि माझी बारामती… याच्या पलीकडे कधी विचारच केला नाही.
पण आज प्रश्न पडतो…
आज दादाला जाऊन तब्बल पाच महिने झाले. पाच महिने म्हणजे १५० हून अधिक दिवस. या काळात राजकारण बदललं, सत्तेची समीकरणं बदलली, अनेक विषय आले आणि गेले. पण त्या एका दिवसाचं सत्य अजूनही महाराष्ट्राला समजलेलं नाही.
सांगितलं जातं की ब्लॅक बॉक्स सापडला आहे. केंद्रीय मंत्री म्हणतात, “सत्य लवकरच समोर येईल.” मग महाराष्ट्र विचारतो इतके महिने का लागले? अंतिम निष्कर्ष कधी येणार?
लोकांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत.
विमानात नेमकी किती जण होते? तपासातून त्याबाबत अंतिम माहिती काय आहे? अपघाताची वेळ नेमकी कोणती? त्या वेळेबाबत वेगवेगळे दावे का झाले? वैमानिकाच्या नियुक्तीबाबत जे प्रश्न उपस्थित झाले, त्यांचं स्पष्टीकरण काय? अपघातानंतर उपलब्ध झालेल्या पुराव्यांबाबत अधिकृत अहवाल काय सांगतो?
हे प्रश्न विचारले की काही जण अस्वस्थ होतात. पण प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही. लोकशाहीत प्रश्न विचारणं हा नागरिकांचा अधिकार आहे आणि उत्तर देणं ही सत्तेची जबाबदारी आहे.
त्या काळात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू होत्या. विलिनीकरणाच्या चर्चा होत होत्या. अनेक नेत्यांनी वेगवेगळी विधानं केली. काही नेते पुढे बोलले नाहीत. या सगळ्यामुळे जनतेच्या मनात शंका निर्माण झाल्या. त्या शंका दूर करण्याचा एकच मार्ग आहे ….. निष्पक्ष आणि पारदर्शक तपास.
आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा केला. कर्नाटकात झिरो क्रमांकाने गुन्हा नोंदवून तो बारामती तालुका पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला. त्यानंतर तो सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. पण पुढे तपासाचं नेमकं काय झालं? अंतिम अहवाल कुठे आहे? जनतेसमोर तो का आला नाही? हे प्रश्न आजही कायम आहेत.
कोणालाही दोषी ठरवण्याचा हेतू नाही. पण सत्य बाहेर यावं, एवढीच अपेक्षा आहे. जर हा अपघात असेल तर तपासाचा अंतिम अहवाल जाहीर करा. ब्लॅक बॉक्समधील निष्कर्ष जनतेसमोर मांडा. अफवांना पूर्णविराम द्या. आणि जर तपासात इतर कोणती बाब समोर आली असेल, तर तीही स्पष्टपणे सांगा.
बारामतीकरांनो…
पाच महिने झाले. वेळ पुढे गेली. पण सत्य अजूनही प्रतीक्षेत आहे.
