September 26, 2026

बिलाविना लाखोंचा गुटखा साठा जप्त ; तिघांवर गुन्हा दाखल

IMG_20260810_204241

बारामती : तालुक्यातील मेदड येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आल्याने अन्न सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३ लाख ५७ हजार ३२१ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सोमनाथ सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळेगाव पोलिस ठाण्यात रामदास बाळू मोरे (रा. मेदड), गौरव जोगदंड (रा. तांदुळवाडी) आणि गणेश मदने (रा. बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, गट क्रमांक ५७६, मेदड, ता. बारामती येथील एका खोलीची तपासणी करण्यात आली. यावेळी विक्री व वितरणाच्या उद्देशाने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा करून ठेवल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रतिबंधित अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेतले असून उर्वरित साठा ताब्यात घेतला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विमल पानमसाला, तंबाखू, डायरेक्टर पान मसाला, शॉर्ट चिव्हिंग तंबाखू, शिमला गुटखा आणि गुलाम गुटखा यांचा समावेश आहे. या संपूर्ण मुद्देमालाची बाजारभावानुसार किंमत ३ लाख ५७ हजार ३२१ रुपये असल्याचे गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे.

चौकशीदरम्यान रामदास मोरे याने सदर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा गौरव जोगदंड आणि गणेश मदने यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विशेष म्हणजे, या मालाच्या खरेदीबाबत कोणतेही बिल किंवा अधिकृत कागदपत्र सादर करण्यात आले नसल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणी अन्न सुरक्षा कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा, वाहतूक तसेच त्यामागील उत्पादक व वितरण साखळीपर्यंत तपास करण्यात यावा, अशी मागणी अन्न सुरक्षा विभागाच्या फिर्यादीत करण्यात आली आहे.

माळेगाव पोलिस ठाण्यात ३० जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

You may have missed

error: Content is protected !!