June 26, 2026

सासवड पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल २१.७० लाखांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त

IMG_20260626_150032

बारामती  : सासवड पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत सुमारे २१ लाख ७० हजार ९६० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री सुमारे ११.२५ वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मौजे बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे येथील कानिफनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका गोदामात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा ठेवण्यात आला आहे.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. तपासणीदरम्यान ‘सिग्नेचर फिनेस्ट पान मसाला’, ‘अॅक्शन-७’ कंपनीची सुगंधी तंबाखू, ‘आर.के.’ कंपनीचा सम्राट पान मसाला तसेच ‘एस.टी.-१’ कंपनीची सुगंधी तंबाखू असा एकूण २१,७०,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सिराज शेख (रा. कोंढवा खुर्द, पुणे) याच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम आणि त्याअंतर्गत नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील तसेच सासवड पोलीस स्टेशनच्या पथकाने सहभाग घेतला.

You may have missed

error: Content is protected !!