जळोची-तांदुळवाडी पाणीपुरवठा योजना नगरपरिषदेकडे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्तांतरणाच्या सूचना
बारामती : बारामती शहर व परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, परिणामकारक आणि दीर्घकालीन स्वरूपाची करण्याच्या दृष्टीने जळोची व तांदुळवाडी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बारामती नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या. तसेच बारामती शहर पाणीपुरवठा योजना टप्पा-२ मधील प्रलंबित कामे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
बारामती शहर पाणीपुरवठा योजनेसह तालुक्यातील विविध २३ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी आज विधान भवन येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बारामती शहराच्या सध्याच्या आणि भविष्यातील पाणी गरजांचा सखोल आढावा घेत विविध प्रलंबित कामांबाबत दिशा-निर्देश देण्यात आले.
बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे, बारामती नगरपालिकेचे गटनेते संजय संघवी तसेच नगरसेवक अल्ताफ सय्यद उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जळोची-तांदुळवाडी पाणीपुरवठा योजना तसेच बारामती शहर पाणीपुरवठा योजना टप्पा-१ अंतर्गत पूर्ण झालेली कामे तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बारामती नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. या हस्तांतरणामुळे स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन, देखभाल व नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याचबरोबर बारामती शहर पाणीपुरवठा योजना टप्पा-२ मधील प्रलंबित कामांचा आढावा घेताना संबंधित विभागांना कामे गतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व कामे पूर्ण करून योजनेचा लाभ नागरिकांना मिळेल यासाठी आवश्यक ती प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.
बैठकीत बारामती शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या साठवण तलावामध्ये आढळून आलेल्या गळतीचा मुद्दाही गांभीर्याने चर्चिला गेला. तलावातील गळतीमुळे भविष्यात पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे आदेश देण्यात आले. पाणीपुरवठा व्यवस्थेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची काळजी घेत आवश्यक तांत्रिक उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
दरम्यान, बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या आणि प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांचाही सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. तालुक्यातील एकूण २३ पाणीपुरवठा योजनांपैकी प्रशासकीय मान्यता प्राप्त योजनांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून नागरिकांना शाश्वत, दर्जेदार आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.
बारामती शहराची वाढती लोकसंख्या, विस्तारत असलेली नागरी वसाहत आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता दीर्घकालीन पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकल्पांना गती देणे अत्यावश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. नागरिकांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ, सुरक्षित आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून वेळबद्ध पद्धतीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीमुळे बारामती शहर व तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, आगामी काळात नागरिकांना अधिक सक्षम आणि शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
