बारामतीत माजी सरपंचाना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत ‘मुळशी पॅटर्न’ची धमकी”
बारामती : बारामती तालुक्यातील सावळ येथील माजी सरपंच तथा शेतकरी रमेश रामचंद्र साबळे यांनी शेतजमीन बळकावण्याच्या उद्देशाने पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा, तसेच “मुळशी पॅटर्न करीन” अशी धमकी देत दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करत बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जमीन वाद, कथित जातीय शिवीगाळ, शस्त्राचा धाक आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे हे प्रकरण तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे.
तक्रारीनुसार, रमेश साबळे हे सावळ गावचे माजी सरपंच असून शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मौजे सावळ मध्ये शेती आहे. या शेताला लागून गोफणे कुटुंबाची जमीन आहे. याच शेजारील जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
९ जून रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास रमेश साबळे हे आपल्या शेतातील विहिरीवर पाण्याची मोटार बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी विजय बाळू गोफणे हा तानाजी शिवाजी गोफणे, धनंजय शिवाजी गोफणे, शिवाजी निवृत्ती गोफणे आणि अतुल धनाजी गावडे यांच्यासह तेथे आल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीनुसार, सुरुवातीपासूनच संबंधितांनी जमीन हस्तांतरणाचा विषय काढला. जमीन आणि विहीर विजय गोफणे यांच्या नावावर करून देण्याची मागणी करण्यात आली. फिर्यादीने त्यास विरोध दर्शवताच वातावरण अधिक तणावपूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
“ये महारा…” म्हणत पिस्तूल डोक्याला लावत तुझी जमीन आणि विहीर माझ्या नावावर करून दे, अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
पिस्तूलातील सर्व गोळ्या डोक्यात घालण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे आपण पूर्णपणे घाबरून गेलो होतो, असे साबळे यांनी जबाबात नमूद केले आहे.
“मुळशी पॅटर्न करीन” या धमकीमुळे वाढली भीती
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे अतुल धनाजी गावडे याने जमीन नावावर कर अन्यथा “मुळशी पॅटर्न करीन” हा दम दिला आहे इशारा. जमीन विजय गोफणे यांच्या नावावर करून दिली नाही तर “तुझा मुळशी पॅटर्न करीन” तसेच “बारामतीमध्ये आमचेच साम्राज्य आहे” असे शब्द वापरून धमकावण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत “मुळशी पॅटर्न” हा शब्दप्रयोग गुन्हेगारी कारवायांशी जोडला गेल्याने अशा प्रकारची धमकी दिल्याचा आरोप अधिक गंभीर मानला जात आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, या वक्तव्यामुळे त्यांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली. तक्रारीत धनंजय गोफणे यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “याचा तीनशे दोन (मर्डर) करा” असेही दम दिला आहे.
याशिवाय तानाजी गोफणे आणि शिवाजी गोफणे यांनीही जमीन हस्तांतरित करण्यासाठी दबाव टाकत “जिवंत सोडणार नाही” अशा धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
भीतीमुळे तक्रार करण्यास झाला विलंब
घटनेनंतर आपण प्रचंड मानसिक तणावाखाली होतो. डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याने आपण इतके घाबरलो की त्याच दिवशी घरातील सदस्यांनाही हा प्रकार सांगू शकलो नाही, असे रमेश साबळे यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या दिवशी पत्नी व मुलांना संपूर्ण घटना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी धीर दिला. त्यानंतर कायदेशीर मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाच जणांविरोधात कारवाईची मागणी
या प्रकरणात रमेश साबळे यांनी विजय बाळू गोफणे, तानाजी शिवाजी गोफणे, धनंजय शिवाजी गोफणे, शिवाजी निवृत्ती गोफणे (सर्व रा. वंजारवाडी, ता. बारामती) आणि अतुल धनाजी गावडे (रा. लिमटेक, ता. बारामती) यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
बारामतीत खळबळ
माजी सरपंच, जमीन वाद, पिस्तूलाचा कथित वापर, जातीय अत्याचाराचे आरोप आणि “मुळशी पॅटर्न” सारख्या धमकीच्या उल्लेखामुळे या प्रकरणाने बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे. या तक्रारीतील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने तसेच पोलीस तपासात अधिकचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून घटनेची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
