September 25, 2026

दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

IMG-20260618-WA0126

बारामती : दौंड, बारामती आणि जुन्नर परिसरात मागील काही महिन्यांपासून दरोडे, जबरी चोरी आणि घरफोडीच्या घटना घडवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका रात्रीत पाच ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या या टोळीतील तीन सराईत आरोपी आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या चौकशीत पुणे ग्रामीण व अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण २० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

दि. १० जून रोजी मध्यरात्री दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोरवडी परिसरातील चार ठिकाणी तसेच श्रीगोंदा परिसरात एका ठिकाणी दरोडे टाकण्यात आले होते. दरोडेखोरांनी घरात घुसून नागरिकांना मारहाण केली, हत्यारांचा धाक दाखवला आणि सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथके तयार करून व्यापक तपास सुरू केला.

तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान गणेश मंगेश काळे, विशाल हंबरड्या काळे आणि किशोर रावण भोसले यांना अटक करण्यात आली. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून ते पोलिसांपासून बचाव करण्यासाठी विविध ठिकाणी वेशांतर करून राहत असल्याचे तपासात समोर आले.

अटकेतील आरोपींकडून सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल असा एकूण २५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या चौकशीत पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दरोड्याचे ४, जबरी चोरीचे ६ आणि घरफोडीचे ५ असे १५ गुन्हे, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या टोळीतील इतर फरार साथीदारांचा शोध सुरू असून तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,. अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, पुणे विभाग, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी,  बापुराव दडस, दौंड उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पो.स्टे. चे पो. नि. हेमंत शेडगे, माळेगाव पो.स्टे. चे सपोनि कुलदीप संकपाळ, स्था.गु.शा.चे पोसई अभिजीत सावंत, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, स्था.गु.शाखेचे पोलीस अंमलदार, शिवाजी निकम, असिफ शेख, सचिन घाडगे, किशोर तेलंग, योगेश नागरगोजे, राजू मोमीन, गणेश धनवे, संतोष भापकर, सुभाष राऊत, गुरूनाथ गायकवाड, विकास कापरे, सुलतान डांगे, रईस मुलाणी, तुषार चव्हाण, गणेश ढेरे, धिरज जाधव, तुषार भोईटे, स्वप्निल अहीवळे, अजय घुले, गणेश होळकर, गुलाब पाटील, शैलेश स्वामी, राहुल पवार, समाधान नाईकनवरे, मपोहवा सुजाता कदम, भाऊसाहेब पुंड, अजय देडे, दौंड पोलीस स्टेशनचे पो.स.ई. अब्दुल बिद्री, पोसई रुपेश कदम, पोलीस अंमलदार नितीन बोराडे, धनंजय गाढवे, पवन माने, गोरख हजारे, सागर म्हेत्रे, रमेश चितारे, संतोष भोसले, सचिन साप्ते, ओमराज कुमकुटे, महेंद्र लोहार, सोमनाथ तांडे, किरण पांढरे, संजय कोठावळे, महिला पोलीस अंमलदार वैशाली बनसोडे, काजल शिंदे, उरुळीकांचन पो. स्टे. चे सचिन जगताप, प्रविण चौधरी यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

You may have missed

error: Content is protected !!