June 17, 2026

बारामतीत अवैध फटाका वाहतुकीचे रॅकेट उघड? 7.79 लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

IMG_20260617_210818

बारामती :बारामती तालुक्यातील मळद हद्दीत फटाक्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत तब्बल 7 लाख 79 हजार 628 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत विविध प्रकारचे फटाके तसेच त्यांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली चार वाहने जप्त करण्यात आली असून संबंधितांकडे स्फोटक पदार्थ वाहतूक व साठवणुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार वैभव साळवे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमनाथ होले (वय 54, खंडोबानगर, बारामती), संदीप नेटके (वय 33, साठेनगर, कसबा बारामती), गणेश गरगडे (वय 32, गुणवरे, ता. फलटण) आणि सुरेश गवारे (वय 60, देसाई इस्टेट, बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 16 जून रोजी दुपारी मळद गावातील हद्दीतील फलटण-बारामती रोडवरील चिंचबन परिसरात पोलिसांनी संशयित वाहनांची तपासणी केली. तपासणीदरम्यान दोन तीनचाकी पेंजो, एक महिंद्रा वेरिटो आणि एक अशोक लेलंड छोटा हत्ती या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर विविध कंपन्यांचे व विविध प्रकारचे फटाके आढळून आले.

कारवाईत 1 लाख 79 हजार 628 रुपयांचे फटाके आणि सुमारे 6 लाख रुपयांहून अधिक किमतीची चार वाहने असा एकूण 7 लाख 79 हजार 628 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपी स्फोटक पदार्थांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक परवाना किंवा अधिकृत कागदपत्रे जवळ न बाळगता हा माल वाहतूक करत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!