भिगवण रोडवरील आर.एस. ब्रदर्ससमोर वाहने लावणे नागरिकांना पडले महागात!
बारामती : बारामती शहरातील भिगवण रोडवरील विमानतळ चौक परिसरात असलेल्या आर.एस. ब्रदर्स या मॉलसमोर फुटपाथ तसेच सर्व्हिस रोडवर वाहने उभी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी अनेक वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
आर.एस. ब्रदर्स या मॉलमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, वाहनतळाची उपलब्धता, पार्किंगचे नियोजन आणि वाढती वाहतूक यामुळे भिगवण रोड परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर काही वाहनचालक आपली वाहने फुटपाथवर किंवा सर्व्हिस रोडवर उभी करत असल्याने पादचारी आणि अन्य वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या प्रकाराची दखल घेत बारामती शहर पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे. मात्र, या कारवाईमुळे खरेदीसाठी मॉलमध्ये जाणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘आर.एस. ब्रदर्समध्ये खरेदीला जायचे म्हणजे गाडी कुठे लावायची? चुकीच्या ठिकाणी गाडी लावली तर गुन्हा दाखल होणार का?’ असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कारवाई वाहनचालकांवर, मग पार्किंग नियोजनाची जबाबदारी कोणाची?
वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे आवश्यकच आहे. मात्र, मोठ्या व्यावसायिक मॉलना परवानगी देताना पुरेशा पार्किंग व्यवस्थेची अट तपासली जाते का? ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन संबंधित आस्थापनांनी पार्किंगची व्यवस्था केली आहे का? तसेच नगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून याबाबत काय नियोजन करण्यात आले आहे, असे प्रश्नही आता उपस्थित होत आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; मात्र त्याचबरोबर नागरिकांना सुरक्षित आणि अधिकृत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही संबंधित यंत्रणांनी पार पाडणे गरजेचे आहे. अन्यथा वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांनी सहन करायचा आणि कारवाईलाही नागरिकांनीच सामोरे जायचे, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
