November 10, 2026

मानव तस्करीची चर्चा, की अपहरण? बारामती पोलिसांसमोर गंभीर आव्हान!

IMG_20261110_125812

बारामती : ऐन दिवाळीच्या काळात बारामतीतून आई-वडिलांचे छत्र नसलेल्या अवघ्या तेरा वर्षांच्या अपंग मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अल्पवयीन आणि अपंग मुलीचे अपहरण झाल्याने ही घटना केवळ अपहरणाची आहे की यामागे मानव तस्करीचा काही प्रकार आहे, अशा चर्चांना परिसरात उधाण आले आहे.

बारामती शहरातील अनंत अशा नगरमधून सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आई-वडिलांचे छत्र नसलेल्या अवघ्या तेरा वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही मुलगी अपंग असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, हे अपहरण नसून यामागे मानव तस्करीचा काही प्रकार आहे का?, अशी शंका आणि चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या चर्चांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक आहे.

मागील काही महिन्यांपासून बारामती आणि ग्रामीण परिसरात अल्पवयीन मुलांना पळवून नेण्याच्या घटनांबाबत तसेच अशा प्रकारचे संदेश समाजमाध्यमांवर वारंवार प्रसारित होत आहेत. मात्र, या घटनांबाबत पोलिसांकडून अद्याप कोणताही ठोस खुलासा नागरिकांसमोर आलेला नसल्याने संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
एकीकडे बारामती शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, दुसरीकडे अल्पवयीन मुलीच्या अपहरणासारखी गंभीर घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नेमके पोलिसांचे चाललेय तरी काय? बारामतीतील नागरिकांची सुरक्षा रामभरोसे आहे की काय?, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून, तिचा तातडीने शोध घेऊन या प्रकरणातील सत्य समोर आणण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.

error: Content is protected !!