September 27, 2026

RTI चा गैरवापर करून 20 लाखांच्या खंडणीची मागणी?

IMG_20260619_123849

बारामती : माहिती अधिकार (RTI) कायद्याचा वापर करून दबाव निर्माण करत 20 लाख रुपयांच्या कथित खंडणीची मागणी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. शासकीय कार्यालयांमध्ये विविध तक्रारी, अर्ज आणि पाठपुराव्याचा आधार घेत एका ग्रामपंचायत सदस्यावर दबाव आणून बदनामीची भीती दाखवत आर्थिक मागणी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुणवडी (ता. बारामती) येथील गोपाळकृष्ण हरिभाऊ हरिहर यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात विविध शासकीय कार्यालयांकडे अर्ज व तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर त्या प्रक्रियेचा आधार घेत मानसिक दबाव निर्माण करून सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आणण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलीस तपासादरम्यान संकलित करण्यात आलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंग, ट्रान्सक्रिप्ट, फॉरेन्सिक प्रमाणपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या प्राथमिक पडताळणीत 20 लाख रुपयांच्या आर्थिक मागणीसंदर्भातील सामग्री समोर आल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. या सर्व बाबींची वैज्ञानिक व कायदेशीर पडताळणी सुरू असून पुढील तपास प्रगतीपथावर आहे.

दरम्यान, माहिती अधिकार कायद्याचा वापर सार्वजनिक हितासाठी झाला होता की संबंधित व्यक्तींवर दबाव निर्माण करण्यासाठी, याचाही तपास केला जात आहे. आरोपी व्यतिरिक्त इतर काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. काही नागरिकांकडून अशाच स्वरूपाच्या तक्रारी समोर येत असल्याने माहिती अधिकार अर्ज, प्रशासकीय तक्रारी किंवा बांधकामासंदर्भातील हरकतींचा आधार घेऊन आर्थिक मागण्या करण्यात आल्या होत्या का, याचीही चौकशी सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानेही अलीकडेच माहिती अधिकार आणि सार्वजनिक तक्रार यंत्रणेच्या संभाव्य गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली होती. कायद्याने दिलेले अधिकार हे लोकशाही मजबूत करण्यासाठी असून त्यांचा वापर दबाव तंत्र, वैयक्तिक वैमनस्य किंवा आर्थिक लाभासाठी होऊ नये, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे तपास करीत आहेत. अशा प्रकारच्या खंडणी, ब्लॅकमेलिंग किंवा दबाव तंत्राच्या घटना घडल्या असल्यास नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!