October 25, 2026

बारामतीत अल्पवयीन मुलीला शिवीगाळ? आईलाही घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

IMG_20261025_194036

बारामती : जिल्हा परिषद शाळेतील अपंग विद्यार्थ्यांसाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने कुपन घेऊन गेलेल्या अल्पवयीन मुलीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा, तसेच तिच्या आईला घरात घुसून मारहाण केल्याचा गंभीर आरोप बारामतीत समोर आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी महिलेला अटक  का झाली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुणवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील अपंग विद्यार्थ्यांसाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना कुपन देऊन पाठविण्यात आले होते. यावेळी एक अल्पवयीन मुलगी शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरी निधीचे कुपन घेऊन गेली. याच कारणावरून करिष्मा मुलाणी या महिलेने मुलीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच मुलीच्या आईच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद असल्याची माहिती आहे. या प्रकरणी स्मिता सकट (वय ४४, रा. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय संबंधांमुळे कारवाईबाबत प्रश्न?
संबंधित महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटात युवती काँग्रेसमध्ये सक्रिय असल्याचा उल्लेख फिर्यादीत असल्याचे सांगण्यात येते.  अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अटक नाही  त्यामुळे या प्रकरणात राजकीय संबंधांचा कारवाईवर काही परिणाम होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अटकेबाबत पोलिसांची भूमिका काय?

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीविरोधात नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, तिला अटक का झाली नाही आणि तपासाची सद्यस्थिती काय आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर येणे महत्त्वाचे आहे. या प्रकरणात पोलिसांनी निष्पक्ष तपास करून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बालकांच्या संरक्षणाच्या कायद्याचाही मुद्दा

या प्रकरणात अल्पवयीन मुलगी पीडित असल्याचा आरोप असल्याने बालकांच्या संरक्षणासंबंधी कायद्यांनुसारही काही तरतुदी लागू होतात का, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. मात्र, उपलब्ध माहितीनुसार या प्रकरणात बालकांच्या संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल नाही.

अल्पवयीन मुलीला  तिच्या शाळेत जाऊन दमदाटी करणे तिचे अपहरण करण्याची धमकी देणे यामुळे एकूणच बालपणावर किती गंभीर परिणाम होऊ शकतात याचं वेळीच पोलिसांनी गांभीर ओळखणे गरजेचे आहे तसेच कथित जातीवाचक शिवीगाळ आणि तिच्या आईला राहत्या घरात घुसून मारहाण केल्याच्या या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, आरोपीला अटक होते का आणि तपासातून कोणती माहिती समोर येते, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

You may have missed

error: Content is protected !!