October 25, 2026

बारामतीत वनपाल लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात!

IMG_20261025_201434

बारामती : शेतातील मातीच्या भरावाचे काम सुरू ठेवण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. जहिर सिराज शेख (वय ४७, पद-वनपाल) असे ताब्यात घेतलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. माळेगाव येथे ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची कोहाळे खुर्द येथे चार हेक्टर शेतजमीन आहे. पावसामुळे शेतातील माती नीरा नदीत वाहून गेल्याने नदीपात्रातील माती शेतात टाकण्याचे काम सुरू होते. या कामावर आक्षेप घेत आरोपी वनपालाने २६ सप्टेंबर रोजी काम बंद केल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित जागा वनविभागाच्या मालकीची असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तसेच काम सुरू ठेवण्याकरिता आरोपीने स्वतःसह सहकारी महिला कर्मचाऱ्यासाठी एकूण १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यापैकी चार हजार रुपये यापूर्वी स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद आहे. उर्वरित सहा हजार रुपयांची मागणी केल्याची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ ऑक्टोबर रोजी केली.

त्यानंतर आज रविवारी माळेगाव येथील हॉटेल शिवकृपाजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारताना वनपालाला पथकाने रंगेहात पकडले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार माळेगाव पोलीस ठाणे, येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सतीश चव्हाण यांच्या पर्यवेक्षणाखाली पथकाने कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

You may have missed

error: Content is protected !!