October 24, 2026

वैद्यकीय पेशाला काळीमा? उपचाराच्या नावाखाली महिला रुग्णाचा विनयभंग केल्याचा आरोप!

IMG_20261024_203320

बारामती  : रुग्णासाठी डॉक्टर हे देवदूत मानले जातात. रुग्णाच्या वेदना दूर करून त्याला नवजीवन देण्याचे पवित्र कार्य डॉक्टरांकडून अपेक्षित असते. मात्र, याच विश्वासाला तडा देणारी धक्कादायक घटना बारामतीत समोर आली आहे. उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाचा उपचाराच्या नावाखाली विनयभंग केल्याचा आरोप एका नामांकित डॉक्टरावर करण्यात आला असून, याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णांच्या सुरक्षिततेचा आणि डॉक्टरांकडून अपेक्षित असलेल्या नैतिकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, संबंधित महिला पोटदुखीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली होती. यावेळी उपचार करण्याच्या नावाखाली डॉक्टरांनी महिलेला व्यायाम करण्यास सांगितले आणि या प्रक्रियेदरम्यान तिचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. उपचारासाठी डॉक्टरांवर विश्वास ठेवून गेलेल्या महिलेला असा अनुभव आल्याच्या आरोपामुळे बारामतीत खळबळ उडाली आहे.

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते हे विश्वासावर आधारलेले असते. रुग्ण आपली शारीरिक व्याधी, वेदना आणि वैयक्तिक अडचणी डॉक्टरांसमोर विश्वासाने मांडत असतो. अशा परिस्थितीत उपचाराच्या नावाखाली गैरवर्तन झाल्याचा आरोप समोर येणे ही गंभीर बाब आहे. रुग्णांच्या विश्वासाचा गैरवापर होत असेल, तर अशा प्रकारांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

दरम्यान, या प्रकरणी डॉ. कलाटे बारामती यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांच्या तपासातून घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. डॉक्टरांवरील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होईल; मात्र या घटनेने डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाच्या नात्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

error: Content is protected !!