October 23, 2026

बारामतीत चाललंय तरी नेमकं काय? राजा, राणी, सरदार अन् पडद्यामागच्या खेळींचं राजकीय रणांगण !

IMG_20261023_124530

बारामती : एक होतं राज्य बारामतीचं, राजकारण होतं भारी, एका पक्षाचे झाले दोन गट, आणि सुरू झाली सत्तेची तयारी!
दोन गटांचे दोन राजे, दोघांची वाट झाली न्यारी, एक गेला सत्तेच्या सिंहासनावर, दुसऱ्याची विरोधात स्वारी!

पण नियतीचा डाव फिरला, सत्तेतल्या राजाचा अकाली अंत झाला, राजा गेला, दरबार हादरला, आणि अनेकांचा आत्मविश्वासच गळाला!

आता राज्य सांभाळायचं होतं, रयतेसमोर प्रश्न मोठा होता, राणीच्या खांद्यावर जबाबदारी, आणि प्रत्येक सरदाराचा हिशेब वेगळा होता!

राणीने घेतला दरबाराचा ताबा, सरदारांना लावला शिस्तीचा धाक, पण पश्चिम पट्ट्यातील काही वीरांनी, उघडली बंडाची नवीच खाक!

राणीने बंड मोडून काढलं, शक्तीचा दाखवला हिसका, पण राजकारणाच्या या पटावर, प्रत्येक मोहरा निघाला वेगळाच किस्सा!

ज्यांनी बंडाला दिला आधार, त्यांच्याशीच आता जुळवावी लागते तार, पदवीधरांच्या रणांगणात, राजकारणाचा सुरू झाला नवा व्यापार!

जिथे कार्यकर्त्यांची वानवा, तिथे ताकदीचा वापर करावा, स्वतःच्या बळावर दुसऱ्यांची लढाई, हा कसला राजकीय डाव आखावा?
तिकडे टॉवरवाले आणि जावईराज, विरोधी गटाच्या दारी, कुणाची रसद, कुणाची मदत, कुणाची पडद्यामागे तयारी?

कोण कुणाचा मित्र इथे, कोण कुणाचा वैरी? निवडणुकीपुरती युती झाली, की बदलते निष्ठा सारी!
बारामतीच्या राजकारणात, निष्ठा झाली का पाहुणी? सत्तेसाठी सरदार फिरती, आणि डाव टाकते राणी!

कालचा मित्र आज विरोधात, कालचा विरोधक आज जवळ, राजकीय सोयीच्या गणितापुढे, तत्त्वांचा पडतोय का बळी?
राजा गेला, राणी आली, सरदारांनी बदलले डाव, जनतेच्या मनात मात्र प्रश्न, हा सत्तेचा खेळ की निष्ठेचा भाव?

बारामतीच्या या राजकारणात, रोज नवा अध्याय लिहिला जातो, पडद्यावर एक, पडद्यामागे दुसरं, आणि जनतेला मात्र कोड्यात टाकलं जातं!
शेवटी एवढंच म्हणावं लागेल— राजे बदलले, सरदार बदलले, बदलल्या राजकीय चाली, पण जनतेच्या दरबारात मात्र, सगळ्यांची नोंद सुरू आहे भली!

कारण बारामतीत सध्या एकच चर्चा— राजकारणात चाललंय तरी नेमकं काय? कोण कुणाचा, कुणासाठी, आणि कुणाचा डाव कुणावर आहे भाय?

You may have missed

error: Content is protected !!