October 23, 2026

उद्योजकाच्या कथित हालचाली; संस्थाचालकालाच संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची शैक्षणिक वर्तुळात चर्चा

IMG_20261023_192330

विशेष बातमी : पुणे राजकारणाचा कसलाही वरदहस्त नसताना, केवळ जिद्द आणि अपार कष्टांच्या जोरावर शून्यातून उभा केलेला ग्रामीण भागातील शिक्षणाचा एक मोठा वटवृक्ष ‘गिळंकृत’ करण्यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू असल्याची सनसनाटी चर्चा सध्या शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे. एका बड्या उद्योजकाकडून ही नामांकित शिक्षण संस्था ताब्यात घेण्यासाठी थेट ‘आर्थिक ताकद’ आणि ‘दबावतंत्रा’चा वापर केला जात असल्याचा कथित प्रकार समोर आल्याने पुणे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

एका ध्येयवेड्या तरुणाने काही वर्षांपूर्वी शिक्षण संस्थेतील सुरक्षित नोकरी सोडून ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे स्वप्न पाहिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेल्या या प्रवासाचे रूपांतर आज एका भव्य शैक्षणिक संकुलात झाले आहे. केजीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत, तसेच इंजिनिअरिंग, बी. फार्मसी, डी. फार्मसी आणि एमबीएसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची सुविधा या संस्थेने एकाच छताखाली उपलब्ध करून दिली. विशेषतः ग्रामीण भागातील हजारो मुलींसाठी ही संस्था उच्च शिक्षणाचा भक्कम आधारवड ठरली आहे.

अनेक वर्षांच्या रक्ताचे पाणी करून उभ्या राहिलेल्या या संस्थेवर आता एका बड्या उद्योजकाची वक्रदृष्टी पडल्याचे बोलले जात आहे. संस्था आणि तिचे नियंत्रण मिळवण्यासाठी अफाट पैशांचा खेळ सुरू असल्याची चर्चा आहे.

संस्थाचालक आणि त्यांच्या नातेवाइकांना विविध कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतकेच नव्हे, तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून स्थानिक प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा गंभीर दावाही केला जात आहे.

कोणत्याही राजकीय पाठिंब्याशिवाय एखाद्या मराठी माणसाने प्रामाणिक कष्टांनी उभे केलेले हे शैक्षणिक विश्व उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे का? असा उद्विग्न सवाल आता उपस्थित होत आहे.

या उद्योजकाने संबंधित संस्था संपवण्यासाठी संस्थेच्या शेजारीच आली शान फार्म हाऊस बांधले आहे त्याच्या शेजारीच सध्या नवीन शिक्षण संस्थेचे काम देखील सुरू केले आहे अशी देखील चर्चा स्थानिक नागरिकात आणि शिक्षण वर्तुळात रंगू लागली आहे

हा प्रश्न या संस्थेत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या आणि शेकडो कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे. त्यामुळे या प्रकरणी झालेले कायदेशीर व्यवहार आणि सुरू असलेले कथित दबावतंत्र यांची निष्पक्ष व सखोल चौकशी होऊन यामागील नेमके सत्य बाहेर येणे हीच काळाची गरज बनली आहे.

error: Content is protected !!