अधिकाऱ्यावरील गुन्ह्याविरोधात कर्मचारी आक्रमक; गुन्हा रद्द करण्यासाठी निवेदन
बारामती : बारामती नगरपरिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी सचिन लक्ष्मण खोरे यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला अदखलपात्र गुन्हा तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच तक्रारदार सोहेल शेख यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बारामती नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांना निवेदन देण्यात आले
निवेदनात म्हटले आहे की, सचिन खोरे हे लोकसेवक म्हणून कार्यरत असून त्यांच्याविरोधात १९ जून रोजी दाखल करण्यात आलेला अदखलपात्र गुन्हा सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच तक्रारदाराने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे व सचिन खोरे यांच्याविषयी समाजमाध्यमांवर अपमानास्पद व बदनामीकारक वक्तव्ये केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सदर प्रकरणामुळे नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. याचा प्रशासकीय कामकाज व कार्यक्षमतेवरही परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराचे कृत्य भारतीय न्याय संहितेतील मानहानीसंबंधी तरतुदी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाईस पात्र असल्याचा दावा करत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा सहआयुक्त (नगर परिषद प्रशासन), नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, बारामती नगर परिषद यांनाही देण्यात येणार आहेत.
दरम्यान सोहेल शेख यांनी कर निरीक्षक सचिन खोरे यांच्यावर काल दिनांक 19 जून रोजी प्रशासकीय अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत असुन सहकार्य करत नाही अपमानास्पद वागणूक देऊन आरडाओरडा करीत असल्याकारणाने बारामती शहर पोलीस ठाण्यात खोरे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याबाबत नगरपालिकेचा असंतोष निर्माण होऊन नगरपालिका कर्मचाऱ्यांनी एकत्रित पोलीस ठाण्यात वरील निवेदन दिले आहे दरम्यान सोहेल शेख यांनी देखील पोलीस महासंचालक मुंबई ,पोलीस अधीक्षक पुणे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, संचालक नगरपालिका प्रशासन संचलनालय मुंबई यांना तक्रारी निवेदन दिले आहे.
