वडगाव निंबाळकरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; अवैध व्यवसायाविरोधात ग्रामस्थांचा संताप
बारामती : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे नीरा-बारामती मार्गालगत असलेल्या एका भंगार दुकानाला शुक्रवारी (दि. १९) पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. आगीत दुकानातील मोठ्या प्रमाणावरील भंगार साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दाट लोकवस्तीत सुरू असलेल्या कथित अवैध भंगार व्यवसायामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी परिसरातील नागरिक गाढ झोपेत असताना अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, फायबर, पीव्हीसी तसेच अन्य ज्वलनशील भंगार साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. या साहित्याला आग लागल्याने आगीचा भडका उडाला आणि दाट धुराचे लोट परिसरात पसरले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नसीर समीर खान या परप्रांतीय व्यावसायिकाकडून अनेक वर्षांपासून झोपडपट्टी परिसरात खोली भाड्याने घेऊन भंगार व्यवसाय केला जात आहे. तसेच आजूबाजूच्या जागेवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्य साठवण्यात आले होते. याच साठ्यातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगीची माहिती मिळताच परिसरातील रहिवासी दत्तात्रय नेवसे, अमित शिंदे, मयूर नेवसे, सचिन ठोंबरे, सलमान आतार, संदीप झगडे आणि सोपान घोलप यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचे फवारे मारत तसेच विद्युत पंपाच्या सहाय्याने त्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे आग शेजारील घरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आली आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित भंगार व्यवसायाबाबत तक्रारी करूनही प्रशासनाने प्रभावी कारवाई केली नसल्याचा आरोप केला आहे. दाट लोकवस्तीत ज्वलनशील पदार्थांचा साठा करून सुरू असलेला असा व्यवसाय नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक असल्याने तातडीने बंद करण्यात यावा, तसेच संबंधित जबाबदार व्यक्तींवर आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे वडगाव निंबाळकर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
