बारामतीत वाईन शॉपीसमोर तुंबळ हाणामारी; दादागिरी करणारेच फिर्यादी?
बारामती : बारामती शहरातील शिवाजी चौक परिसरात असलेल्या व्हॅली वाईन अँड बिअर शॉपीसमोर दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात ज्यांच्यामुळे वादाला सुरुवात झाली, दारूच्या नशेत दादागिरी आणि गुंडगिरी करण्याचा आरोप ज्या गटावर होत आहे, त्याच गटाची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे “चोर ते चोर आणि वर शिरजोर” अशीच चर्चा सध्या शहरभर रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी चौकातील व्हॅली वाईन अँड बिअर शॉपी येथे काही युवक दारू खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या एका गटाने परिसरात दादागिरी करण्यास सुरुवात केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच हाणामारीपर्यंत पोहोचला. दोन्ही गटांतील युवकांनी एकमेकांवर धावून जात मारहाण केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असता, वादाला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या गटाचीच फिर्याद नोंदविण्यात आल्याची चर्चा आहे.
या घटनेत प्रत्यक्षात नेमके कोण आक्रमक होते, वादाची सुरुवात कोणी केली, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसते आणि दोन्ही बाजूंची भूमिका काय आहे, याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. एका गटाचीच फिर्याद घेऊन दुसऱ्या बाजूची भूमिका दुर्लक्षित केली जात असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, शहरातील मुख्य चौकात भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष तपास करून सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आधी दादागिरी करायची आणि परिसरातील वातावरण दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग करायची, मंग यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर, आरोपींना सार्वजनिक चोप दिल्यानंतर कायदा हातात घेतला म्हणायचं का? असा सवाल उपस्थित होतो. ज्याच्यामुळे सार्वजनिक शांतता भंग झाली ज्याने प्रत्यक्ष घटनास्थळी दादागिरी केली भांडण केलं, शेवटी तोच फिर्यादी, मात्र ज्याला मारलं, तो मात्र ना आरोपी ना फिर्यादी, ना त्याला न्याय भेटला तो मात्र दवाखान्यात उपचार घेतोय, आणि झाल्या प्रकारात मार खाणारा साठी जे धावून गेले ते झाले आरोपी.
या घटनेमुळे शहरात एकच चर्चा सुरू असून, “दादागिरी करणारेच फिर्यादी कसे?” असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांचा पुढील तपास आणि त्यातून समोर येणारे तथ्य याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
