June 14, 2026

हरवलेले दीड लाखांचे मंगळसूत्र अवघ्या १२ तासांत शोधून सुपूर्द; सुपा पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक

IMG_20260614_160118

बारामती : सुपा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध (डीबी) पथकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे हरवलेले सव्वा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र अवघ्या १२ तासांत शोधून मूळ मालक महिलेला परत करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे सुपा पोलिसांचे कौतुक होत आहे.

मौजे सुपा (ता. बारामती) येथील पीडीसीसी बँक परिसरात १३ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शितल विकास टेमगिरे (रा. भरतगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांचे गळ्यातील सव्वा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हरवले होते. याबाबत त्यांनी सुपा पोलीस स्टेशनशी संपर्क साधून मदतीची विनंती केली होती.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल किसनराव ताडगे, महादेव साळुंखे आणि भाऊसाहेब चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू करण्यात आली.

सखोल तपासादरम्यान सदर मंगळसूत्र एका महिलेला सापडल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधित महिलेकडून मंगळसूत्र ताब्यात घेऊन ते मूळ मालक शितल टेमगिरे यांना परत करण्यात आले.

हरवलेल्या मंगळसूत्राची किंमत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये असून, इतक्या कमी वेळेत ते शोधून दिल्याने शितल टेमगिरे यांनी सुपा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान, कोणतीही मौल्यवान वस्तू हरवल्यास किंवा सापडल्यास तसेच संशयास्पद व्यक्ती, वस्तू अथवा घटना आढळल्यास नागरिकांनी तात्काळ सुपा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!