June 15, 2026

दोन गावठी पिस्टल, एक रायफलसह सराईत गुन्हेगार जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

file_00000000a4bc7209b1006da1c09d3064

बारामती : माळेगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर धडक कारवाई करत दोन गावठी पिस्टल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्यांसह आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या निर्देशानुसार तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना १३ जून रोजी गोपनीय माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी (ता. बारामती) येथील अक्षय कल्याण तावरे (वय ३५, रा. वाघवस्ती, सांगवी) हा गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसांसह संशयास्पदरीत्या फिरत होता. माहितीची खातरजमा केल्यानंतर गुन्हे शोध पथकाने सांगवी येथे सापळा रचला.

कार्तिक हॉटेलसमोर खुर्चीवर बसलेल्या संशयिताला पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला दोन गावठी बनावटीची पिस्टले, तर खिशात दोन जिवंत काडतुसे आणि दोन वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या आढळून आल्या.

यानंतर पोलिसांनी आरोपीच्या वाघवस्ती, सांगवी येथील राहत्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली. घरालगतच्या गोठ्यातील प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवून ठेवलेली एक रायफलही जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने ही शस्त्रे सुमारे आठ महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातून आणल्याची कबुली दिली. तसेच गावठी पिस्टलची चाचणी घेण्यासाठी शिरवली येथील निरा नदी परिसरात गोळीबार केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून दोन गावठी पिस्टले, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे आणि दोन वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय तावरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत मालमत्तेविरुद्ध तसेच मानवी शरीराविरुद्धच्या स्वरूपाचे एकूण २६ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. आर. साळवे, तुषार भोर, पोलीस हवालदार विजय वाघमोडे, राहुल पांढरे तसेच पोलीस अंमलदार अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, अमोल कोकरे, नंदकुमार गव्हाणे, अमोल वाघमारे आणि जयसिंग कचरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

error: Content is protected !!