पोलिसांची कारवाई; गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस व कुकरीसह दोघांवर गुन्हा
बारामती : माळेगाव खुर्द (ता. बारामती) गावच्या हद्दीत माळेगाव-करावाग रोडवरील तुकाई चौक परिसरात माळेगाव पोलिसांनी कारवाई करत गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि कुकरी चाकूसह दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश तात्या गावडे (वय 20, रा. करावाग, ता. बारामती) हा त्याच्या ताब्यात विनापरवाना एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस तसेच कुकरी चाकू बाळगत असल्याचे आढळून आले. यावेळी सदरचा पिस्तुल मयूर विष्णू मोरे (वय 20, रा. मेडद, ता. बारामती) याच्याकडून आनला असल्याचे समोर आले. आरोपी यांच्याकडे एमएच 42 एएक्स 4428 क्रमांकाची चारचाकी गाडीही होती.
अज्ञात कारणासाठी बेकायदेशीररीत्या शस्त्रे जवळबाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या 20 वर्षांच्या तरुणांकडून गावठी पिस्तूल आणि धारदार शस्त्रे बाळगली जात असल्याच्या घटना चिंताजनक मानल्या जात आहेत. चित्रपटांमधील गुन्हेगारीचे आकर्षण, महागड्या चारचाकी गाड्या, कमरेला पिस्तूल, हातात धारदार शस्त्रे आणि दिखाऊ जीवनशैली यांचे वाढते आकर्षण काही युवकांना चुकीच्या मार्गाकडे खेचत आहे का, असा प्रश्न या घटनेनिमित्त उपस्थित होत आहे.
समाजमाध्यमांचा प्रभाव, गुन्हेगारांचे होत असलेले उदात्तीकरण आणि झटपट प्रसिद्धी मिळविण्याची मानसिकता यामुळे नव्या पिढीमध्ये गुन्हेगारीकडे आकर्षण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या हालचाली, मित्रपरिवार आणि सोशल मीडियावरील वर्तनावर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
कायद्याचा धाक आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव युवकांमध्ये निर्माण करणे काळाची गरज असल्याचे मत सुजाण नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
