June 12, 2026

पहिल्याच सभेत किशोर मासाळ यांच्याविरोधात निषेधाचा ठराव; बारामतीच्या राजकारणात पुन्हा खळबळ

IMG_20260612_225412

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले नगरसेवक किशोर मासाळ हे बारामती नगर परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेच्या कार्यकाळातील पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने विकासकामे, प्रशासनिक निर्णय आणि नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होणार अशी अपेक्षा असणार  मात्र सभेच्या प्रारंभीच मासाळ यांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित होताच सभागृहातील वातावरण तापले आणि संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू हा विषय ठरला.

सभा सुरू होताच नगरसेवक नवनाथ बल्लाळ, अमर धुमाळ आणि विशाल हिंगणे यांनी किशोर मासाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे केवळ बारामतीचे राजकीय नेतृत्व नसून बारामतीच्या विकासाच्या प्रवासातील प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने राज्यासह देशाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे अशा नेत्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणे म्हणजे बारामतीच्या जनतेच्या भावना दुखावण्यासारखे असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले.

नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी बोलताना, “बारामतीचा विकास, औद्योगिक प्रगती, शैक्षणिक संकुले, सिंचन प्रकल्प आणि नागरी सुविधांचा विस्तार यामागे अजितदादा पवार यांचे योगदान मोठे आहे. अशा व्यक्तीबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे हे केवळ राजकीय मतभेद नसून बारामतीच्या स्वाभिमानावर आघात करणारे आहे,” असे सांगत निषेधाचा प्रस्ताव सभागृहात मांडला.
नगरसेवक अमर धुमाळ यांनीदेखील संबंधित वक्तव्यावर टीका करत लोकप्रतिनिधींनी आपल्या वक्तव्यांमध्ये संयम आणि जबाबदारी राखली पाहिजे, असे मत व्यक्त केले. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींच्या प्रत्येक शब्दाचा समाजावर परिणाम होत असतो. त्यामुळे राजकीय मतभेद असले तरी व्यक्तीगत पातळीवर टीका करताना मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.

नगरसेवक विशाल हिंगणे यांनी या विषयावर भूमिका मांडताना, “सभागृहाने पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन बारामतीच्या अस्मितेशी संबंधित प्रश्नावर एकमताने भूमिका घेणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले. त्यांच्या या भूमिकेला अनेक सदस्यांनी पाठिंबा दिला.

दरम्यान, चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी आपापली मते मांडत मासाळ यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काही काळ सभागृहात वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर निषेधाचा ठराव मांडण्यात आला आणि उपस्थित सदस्यांनी त्यास समर्थन देत ठराव मंजूर केला.

या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमीही तितकीच महत्त्वाची मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी किशोर मासाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बारामतीसह राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या वक्तव्याचा निषेध केला होता निषेध निवेदन देण्यात आले होते.

वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर किशोर मासाळ यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागितली होती. तसेच आत्मक्लेश करत खेद व्यक्त केला होता. पक्षातील विविध पदाचा राजीनामाही त्यांनी दिला होता. मात्र नगरसेवक पदाचा राजीनामा देण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हा विषय अधिकच चर्चेत आला होता.
विशेष म्हणजे, आजच्या सभेला येताना किशोर मासाळ हे पारंपरिक धनगरी वेशभूषेत उपस्थित राहिले. त्यांच्या या वेगळ्या उपस्थितीची सभागृहाबाहेर चर्चा रंगली. काहींनी याकडे प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले, तर काहींनी याला केवळ प्रतीकात्मक कृती मानले. मात्र सभागृहातील चर्चेचा केंद्रबिंदू त्यांच्या वेशभूषेपेक्षा त्यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि त्यावरील निषेध हाच राहिला.

राजकीय विश्लेषकांच्या मते, नगर परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या विषयावर ठराव मंजूर होणे हे केवळ एका वक्तव्याविरोधातील प्रतिक्रिया नसून बारामतीतील राजकीय संदेश म्हणूनही पाहिले जात आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबत पक्षीय आणि स्थानिक पातळीवर असलेली भावना या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सभागृहातील निषेधाच्या ठरावानंतर या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला असून बारामतीच्या राजकारणात हा विषय आगामी काळातही चर्चेचा केंद्रबिंदू राहण्याची चिन्हे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात झालेली ही चर्चा आणि त्यातून व्यक्त झालेली भूमिका आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

error: Content is protected !!