बारामतीत कॉपीराइट कायद्याअंतर्गत कारवाई; नामांकित कंपनीच्या उत्पादनाची हुबेहूब नक्कल केल्याचा आरोप
बारामती : बारामती शहरातील पाटस रोडवरील समीर एंटरप्राईजेस या दुकानात नामांकित कंपनीच्या उत्पादनाची हुबेहूब नक्कल करून बनावट मालाची विक्री व साठवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दुकानमालक शरफुद्दीन सैफुल्लाह कुरेशी (वय ३८, रा. रेणुका नगर, फलटण रोड, बारामती) याच्याविरुद्ध कॉपीराइट (प्रतीलिपी अधिकार) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल फिर्यादीमधिल माहितीनुसार, दिनांक २ जून २०२६ रोजी समीर एंटरप्राईजेस, देशमुख वस्ती, पाटस रोड, बारामती येथे तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान आरोपीच्या ताब्यात SAINT-GOBAIN INDIA PRIVATE LIMITED या कंपनीच्या उत्पादनाच्या डिझाइनची नक्कल करून तयार करण्यात आलेल्या बनावट पीओपी सिलिंग पट्ट्यांचा साठा आढळून आला. हा माल मूळ कंपनीच्या उत्पादनाप्रमाणेच असल्याचा भास निर्माण करून ग्राहकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे
तपासात सुमारे ८२ हजार ६०० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला असून त्याची विक्री व साठवणूक सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी स्पीड सर्च अँड सिक्युरिटी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे प्रतिनिधी सरफराज तांबोळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित आरोपीविरुद्ध कॉपीराइट कायद्याच्या तरतुदीनुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
भंगार व्यवसायातून बनावट उत्पादन उद्योगाकडे?
दरम्यान, या प्रकरणाची बारामती शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर बोलले जात असलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा मूळचा परप्रांतीय असून सुरुवातीच्या काळात भंगार व्यवसायाशी संबंधित होता. त्यानंतर त्याने विविध ब्रँडच्या उत्पादनांच्या डिझाइनची नक्कल करून बनावट माल तयार करण्याचा व्यवसाय सुरू केल्याची चर्चा आहे. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
मूळ सूत्रधार कोण?
या प्रकरणात आणखी कोणाचे आर्थिक किंवा व्यावसायिक पाठबळ आहे का, तसेच संबंधित व्यक्तीकडे उपलब्ध असलेली स्थानिक कागदपत्रे कशी मिळाली याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. केवळ विक्रेत्यावर कारवाई न करता बनावट उत्पादनांच्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलिस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा अधिक तपास करत असून बनावट साहित्याच्या बाजारपेठेतील संभाव्य रॅकेटचा शोध घेतला जात आहे.
