June 12, 2026

कर्नाटकातून आणलेला गुटखा बारामतीत जप्त; दुकानदार अटकेत

file_00000000ed7c720b9e1d775c7952fcd9

बारामती : महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या विक्री आणि साठवणुकीविरोधात बारामती शहर पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तरित्या मोठी कारवाई केली. या कारवाईत ५५ हजार २४४ रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित दुकानदारास अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी संदीप दिगंबरराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी संदीप शिंदे, सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे तसेच पंच यांच्या उपस्थितीत जळोची येथील भिगवण रोडवरील मे. धानेश्वरी किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स या दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला.

या कारवाईत प्रीमियम आर.एम.डी. पानमसाला, एम सेंटेड तंबाखू, डायरेक्टर पान मसाला, विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, गुलाम गुटखा, बाजीगर गुटखा, के.आर. १००० गुटखा आदी विविध ब्रँडचा माल जप्त करण्यात आला. जप्त मालाची एकूण किंमत ५५ हजार २४४ रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकशीदरम्यान दुकानाचे मालक व विक्रेते गणेश गुरुशांताप्पा गुरुभेट्टी (वय ३८, रा. बारामती) यांनी हा प्रतिबंधित माल कर्नाटक राज्यातून आणल्याची माहिती दिली. मात्र त्याबाबत कोणतेही वैध खरेदी बिल किंवा आवश्यक कागदपत्रे सादर करता आली नाहीत.
सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रतिबंधित अन्नपदार्थांचा पुनर्वापर किंवा पुनर्विक्री होऊ नये यासाठी संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी गणेश गुरुभेट्टी यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा पुरवठादार, वाहतूकदार, वितरक व उत्पादक यांच्याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

विशेष म्हणजे, या प्रकरणाचा तपास केवळ किरकोळ विक्रेत्यांपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील प्रतिबंधित गुटखा व तंबाखूच्या चोरट्या व्यापाराची संपूर्ण साखळी उघड करण्याच्या दृष्टीने आर्थिक व्यवहार, वाहतूक व्यवस्था, पुरवठादार, वितरक व उत्पादक यांच्यापर्यंत विस्तारित करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे करीत असून अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

error: Content is protected !!