बारामतीत गुटखा माफियांचे जाळे मजबूत?; ‘कुंपणच शेण खात असेल तर कारवाई कोण करणार?’ असा नागरिकांचा सवाल
बारामती : बारामती शहर आणि तालुक्यात बंदी असलेल्या गुटख्याचा व्यवसाय आजही राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. गुटखा विक्री आणि पुरवठ्यामागे काही प्रभावशाली व्यक्तींचे तसेच संबंधित यंत्रणेतील काही घटकांचे कथित पाठबळ असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे गुटखा विक्रेत्यांचे मनोबल वाढल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार, तांदुळवाडी परिसरातील एका व्यक्तीला कथितरित्या एका पोलिस कर्मचाऱ्याकडून गुटखा खरेदी आणि पुरवठ्यासाठी मदत केली जात असल्याचे आरोप समोर येत आहेत. परिसरातील एक व्यापारी मोठ्या प्रमाणावर गुटख्याची एजन्सी चालवत असल्याची चर्चा असून, या माध्यमातून तालुक्यात गुटख्याचे जाळे विस्तारले असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित व्यापारी बारामतीत इको आणि पिकप या दोन गाड्यांच्या माध्यमातून गुटख्याचा पुरवठा करीत असल्याचे निदर्शनास आले
गुटखा विक्रीवर राज्यात बंदी असतानाही बारामतीतील अनेक भागांत सहजपणे गुटखा उपलब्ध होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांच्या आसपासही गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, गुटख्याच्या अवैध व्यवसायाची साखळी मोडून काढायची असेल तर केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून उपयोग होणार नाही. पुरवठादार, साठेबाज आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या घटकांपर्यंत पोहोचून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. “गुटखा कुठून येतो, कोण वितरित करतो आणि कोणाच्या संरक्षणाखाली हा व्यवसाय सुरू आहे?” याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जर चर्चेत असलेल्या प्रमुख पुरवठादारांवर आणि त्यांच्या कथित नेटवर्कवर प्रभावी कारवाई झाली तर बारामतीतील गुटख्याची संपूर्ण साखळी कोलमडू शकते. मात्र, संबंधित आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
“जिथे कुंपणच शेण खात असेल, तिथे चोरीची तक्रार कोणाकडे करायची?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, गुटखा विक्रीला पाठबळ देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
येत्या दोन दिवसात बारामती प्रशासनाचे अधिकारी छापा करणार आहेत असे चर्चा आहे, मात्र बारामतीतील या व्यापाऱ्यावर कारवाई होते का नाही हे येणाऱ्या काळात समोर येईल.
