बुके देण्याचा बहाणा, बारामतीत गोळीबाराचा थरार अन् कोयत्याने वार!
बारामती : हातात बुके घेऊन भेटायला यायचे, विश्वास संपादन करायचा आणि अचानक गोळीबार करीत कोयत्याने वार करायचे! एखाद्या चित्रपटातील थरारक प्रसंग वाटावा, अशी घटना रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) सायंकाळी बारामतीच्या विमानतळ परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राणा शिपिंग कंपनीचे मालक व उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गोळी लागल्याचे समजते. गोळीबारानंतर त्यांच्यावर कोयत्यानेही वार करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेने बारामतीच्या व्यावसायिक वर्तुळासह संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्ती बुके देण्याच्या बहाण्याने राणा सूर्यवंशी यांना भेटण्यासाठी हल्लेखोर आले होते. मात्र, या भेटीदरम्यान अचानक गोळीबार झाल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या हाताला गोळी लागली. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्यानेही वार केल्याचे सांगण्यात येत आहे.
साध्या भेटीच्या बहाण्याने आलेल्या व्यक्तींकडून असा हल्ला झाल्याची माहिती समोर आल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. हल्लेखोरांनी पूर्वनियोजन केले होते का, त्यांना सूर्यवंशी यांच्या हालचालींची माहिती होती का आणि या हल्ल्यामागे नेमके कोणते कारण आहे, याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
हल्ल्यानंतर जखमी राणा सूर्यवंशी यांना तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.
राणा सूर्यवंशी यांच्याकडे मोठी सुरक्षा व्यवस्था असल्याचे सांगितले जात असताना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने सुरक्षेच्या प्रभावीपणाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हल्लेखोरांनी गोळीबार करण्याचे धाडस कसे केले? त्यांना विरोध होऊ नये म्हणून काही नियोजन केले होते का? हल्ल्यानंतर ते कोणत्या मार्गाने पसार झाले? या प्रश्नांची उत्तरे तपासातूनच स्पष्ट होतील.
विमानतळ परिसर हा बारामतीतील महत्त्वाचा भाग मानला जातो. अशा परिसरात उद्योजकावर गोळीबार झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. घटनेमागील कारण स्पष्ट होईपर्यंत विविध चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे. राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे वैयक्तिक वाद, व्यावसायिक कारण किंवा अन्य काही पार्श्वभूमी आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
