October 10, 2026

सोमेश्वरच्या निवडणुकीत ‘लक्ष्मी दर्शन’ची चर्चा; पॅनेलमधील गटबाजी चव्हाट्यावर!

IMG_20261010_223901

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सांगता सभा होताच पैशांच्या कथित वाटपावरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. माळेगावच्या नगराध्यक्षांच्या गाडीतून पैसे वाटप होत असल्याचा दावा पुरुषोत्तम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी केला. तर माजी आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीवर पैसे वाटपाचे आरोप केले.
दुसरीकडे, पॅनेल टू पॅनेल मतदानाचे आवाहन केले जात असतानाही काही उमेदवारांकडून केवळ स्वतःलाच मतदान करण्याची विनंती सभासदांना केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पॅनेलमधील अंतर्गत मतभेद उघड होत असल्याचे चित्र आहे.

एकीकडे नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, तर दुसरीकडे उमेदवारांची स्वतंत्र धडपड! ग्रामीण भागातील गटबाजी रोखण्यात तालुका  अध्यक्ष भूमिका महत्त्वाची असताना, प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातील घडामोडींमुळे नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. तालुकाध्यक्ष पार्ट्या, जेवणावळीमध्ये गुंतले असतात  त्यामुळे एकूणच प्रचाराची धुरा त्रयस्थांच्या हाती आहे की काय असा सवाल उपस्थित होतो. कारखान्याची निवडणूक सभासदांच्या हितासाठी आहे की राजकीय प्रतिष्ठा आणि वैयक्तिक गणितांसाठी, असा सवाल आता उपस्थित होत आहे. पैशांच्या वाटपाबाबत करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता स्पष्ट होणे बाकी असले, तरी या आरोपांमुळे सोमेश्वरच्या निवडणुकीतील वातावरण चांगलेच तापले आहे.

आता होणाऱ्या मतदानातून सभासद कोणाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You may have missed

error: Content is protected !!