September 6, 2026

बारामतीत खळबळ! मृतावस्थेत अर्भक आढळले

IMG_20260604_222056

बारामती  : बारामती शहरातील आमराई परिसरात मृतावस्थेत अर्भक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले असून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी ते सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आमराई परिसरात काही नागरिकांना अर्भक पडलेले दिसून आले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अर्भक ताब्यात घेतले. हे अर्भक नेमके कोणाचे आहे, ते येथे कसे आले आणि त्यामागे नेमके काय कारण आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशी माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली

दरम्यान, परिसरात अर्भक आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून विविध चर्चांनाही उधाण आले आहे.

प्राथमिक स्तरावर काही नागरिकांकडून हे अर्भक मांजरीने आणल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिसांकडून सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

पोलिसांकडून परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू असून अर्भकाची ओळख पटविणे, त्याचे पालक किंवा संबंधित व्यक्तींचा शोध घेणे तसेच मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे बारामती शहरात हळहळ व्यक्त होत असून अर्भकाला अशा अवस्थेत सोडून देण्यात आले का, की त्यामागे अन्य काही कारण आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.

error: Content is protected !!