June 6, 2026

बारामतीत गुटखा साम्राज्याचा विस्तार सुरूच?; आणखी एका एजन्सीची माहिती समोर, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

file_000000002268720b8a38a3e2c0bcc679

बारामती :  बारामती शहर व परिसरात गुटख्याच्या बेकायदा विक्रीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा सुरू असतानाच आता आणखी एका कथित गुटखा एजन्सीची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नुकतीच तांदुळवाडी परिसरातील एका एजन्सीबाबत चर्चा रंगली असताना आता तालुक्यातील मळद परिसरातील आणखी एका एजन्सीविषयी माहिती पुढे येत असल्याने बारामतीतील गुटखा साखळी नेमकी किती मोठी आहे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही बारामतीत काही ठिकाणी खुलेआम गुटखा उपलब्ध होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. किरकोळ पानटपऱ्यांपासून काही मोठ्या विक्रेत्यांपर्यंत गुटख्याचा पुरवठा नियमितपणे होत असल्याची चर्चा असून, या संपूर्ण साखळीमागे नेमके कोण आहे, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा बारामती व परिसरातील विक्रेत्यांपर्यंत पोहोचवला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या व्यवहारांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, गुटख्याचा हा कथित बेकायदा व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असताना संबंधित यंत्रणांच्या कारवाईबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक, साठवणूक आणि वितरण होत असेल तर संबंधित विभागांना याची माहिती नसणे शक्य आहे का?  असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, तांदुळवाडीतील एजन्सीची चर्चा ताजी असतानाच आता मळद परिसरातील कथित गुलाम गुटखा एजन्सीची माहिती पुढे येत असल्याने गुटखा साखळीची व्याप्ती आणखी मोठी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे तपास करून या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे.

बारामतीत गुटख्याच्या वाढत्या विळख्यामुळे युवकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कथित गुटखा साम्राज्याचा सूत्रधार कोण, पुरवठा कुठून होतो आणि कोणाच्या आशीर्वादाने हा व्यवसाय सुरू आहे, याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!