बारामतीत ‘ओपन बार’वर पोलिसांचा दणका; चार जणांवर गुन्हे दाखल
बारामती : बारामती एमआयडीसी परिसरातील रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या बेकायदा ‘ओपन बार’ प्रकारावर बारामती तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत संबंधितांना चांगलाच चाप लावला आहे. नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
एमआयडीसी रोडवरील वैभव वाईन्सच्या शेजारी काही टपऱ्यांवर दारू पिण्यासाठी उघडपणे प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी ७ ते ९.३० दरम्यान पेट्रोलिंग करत पोलिसांनी अचानक छापा टाकला.
या कारवाईत संतोष शहा (गुड्डू पान शॉप) व अशोक लोंढे (टी टपरी चालक) हे दारू घेऊन बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना रस्त्यावरच ग्लास, पाणी व इतर साहित्य पुरवून त्याच ठिकाणी बसून मद्यपान करण्यास प्रवृत्त करत असल्याचे उघड झाले. यामुळे परिसरात मद्यपींची वर्दळ वाढून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
दरम्यान, अशिष वाल्मिकी (अंडा भुर्जी टपरी) व नौशाद मुलानी (नूर चिकन सेंटर) हे देखील परवान्याविना व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच या सर्वांकडून कचरा रस्त्यावर टाकून परिसर अस्वच्छ केला जात असल्याचेही आढळले.
या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. कारवाईदरम्यान संबंधितांची वाहने व साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम व त्यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईनंतर एमआयडीसी परिसरातील बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
