पोलीस कस्टडीत आरोपीची आत्महत्या; संवेदनशील प्रकरणात प्रशासनावर प्रश्नचिन्ह
बारामती : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली असून, बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात (POCSO कायद्यांतर्गत) अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलीस कस्टडीत असताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या दक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियमासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे पोलिसांनी आरोपीला अटक करून कोठडीत ठेवले होते. मात्र, कोठडीत असतानाच त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने पोलीस ठाण्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या आहेत. कोठडीत आरोपीने आत्महत्या कशी केली, याबाबत संशय व्यक्त केला जात असून, देखरेखीतील निष्काळजीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अवघ्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून, या प्रकरणात संबंधित मुलीचा गर्भपात करणाऱ्या वैद्यकीय तज्ञावर काय कारवाई होणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. यासोबतच या प्रक्रियेत मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींवरही गुन्हे दाखल होणार का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
तसेच, अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये माध्यमांकडून होणाऱ्या ‘मीडिया ट्रायल’मुळे तपासावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण, आणि अशा प्रकरणांमध्ये माहिती देताना कोणती मर्यादा पाळली जावी, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून पोलीस प्रशासनावर दबाव वाढला आहे. घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येण्याची शक्यता असून, येणाऱ्या काळात पोलीस प्रशासनाला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाणार आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व संबंधित आरोपींना कायद्याचा हिसका दाखवण्यात येईल.”
