November 2, 2026

पंचायत समितीसमोरील धरणे आंदोलन भोवले; विक्रम कोकरे यांच्यावर गुन्हा दाखल!

IMG_20261102_204802

बारामती : बारामती पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनादरम्यान प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विक्रम भरतराव कोकरे (रा. पणदरे, ता. बारामती) यांच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

पणदरे गावातील ग्रामपंचायत मिळकत क्रमांक १९२/०३ मधील अंगणवाडीसाठी नियोजित जागेवरील कथित अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी विक्रम कोकरे यांनी ८ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती बारामती व संबंधित शासकीय कार्यालयांकडे अर्ज व निवेदने दिली होती. त्यानंतर १४ ऑक्टोबरपासून त्यांनी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन सुरू केले होते.

दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. या आदेशानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे, मोर्चा काढणे, सभा घेणे, मोठ्या आवाजात वाद्य वाजविणे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यावर निर्बंध होते.

पोलीस तक्रारीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी आंदोलनस्थळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमल्या होत्या. यावेळी संबळासारखी वाद्ये मोठ्या आवाजात वाजविणे, मोठ्याने घोषणा देणे तसेच जागरण-गोंधळासारखा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी पोलिसांनी विक्रम कोकरे यांना प्रतिबंधात्मक नोटीस देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याचेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात १९ ऑक्टोबर रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी नोंद करण्यात आली होती.

या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल देवकाते यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून ३० ऑक्टोबर रोजी रात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार यशवंत ज्ञानदेव पवार करीत आहेत.

error: Content is protected !!