November 2, 2026

बारामतीत तालमीच्या मातीखाली शस्त्रसाठा; चार आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी!

IMG_20261102_200028

बारामती : कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली लपवून ठेवलेला घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. कसबा परिसरातील शिवाजीनगर गणेश मंदिराशेजारील तालमीतून चार धारदार कोयते आणि एक तलवार अशी पाच शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जुन्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी जयेश माने याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

३१ ऑक्टोबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जामदार रोड परिसरातील कुस्तीच्या तालमीत धारदार शस्त्रे लपवून ठेवण्यात आली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रात्री साडेदहाच्या सुमारास तालमीत धाव घेतली. पंचांच्या उपस्थितीत केलेल्या झडतीमध्ये लाल मातीखाली लपवलेले चार कोयते आणि एक तलवार आढळून आली.

या प्रकरणात अभिजीत प्रदीप शिंदे (वय २७), योगेश ऊर्फ धन्या गोकुळ कांबळे (वय २९), ऋषिकेश ऊर्फ पप्पू सुनील चंदनशिवे (वय २६) आणि आदेश संजय कुचेकर (वय २५) यांना अटक करण्यात आली आहे. तर अर्थव सतीश सोनवणे (वय २०) याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळासमोरील चार दुचाकींचीही नोंद पोलिसांनी घेतली आहे.

अकरा पूर्वगुन्ह्यांची नोंद!

अटक केलेल्या चारही आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती तपासात समोर आली आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, मारहाण आणि धमकी यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या एकूण ११ पूर्वगुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये मोक्का कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचाही समावेश आहे. संबंधित प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

या तालमीच्या  प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने चार आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

शस्त्रे कोणी पुरवली, हल्ल्याचे लक्ष्य कोण?

जप्त केलेली शस्त्रे कोठून आणली, ती तालमीतील लाल मातीखाली कोणी लपवली, त्यासाठी आर्थिक मदत कोणी केली आणि प्रस्तावित हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. या शस्त्रांचा वापर करून नेमका कोणता गुन्हा घडविण्याचे नियोजन होते, याचाही शोध घेतला जात आहे.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनीषा ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी करीत आहेत.

error: Content is protected !!