July 10, 2026

बारामती हादरली! दोन गटांतील रक्तरंजित संघर्षाने शहरात काही काळ दंगलसदृश स्थिती; पोलिस कर्मचाऱ्यासह अनेक जखमी

IMG_20260710_205303

बारामती : बारामती शहरात गुरुवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या तुफानी संघर्षामुळे संपूर्ण शहरात काही काळ अक्षरशः हादरून गेले. किरकोळ वादातून सुरू झालेला हा संघर्ष काही क्षणांतच उग्र स्वरूप धारण करत तुंबळ हाणामारीत बदलला. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवल्याने परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या हिंसक प्रकारात दोन्ही गटांतील अनेक जण जखमी झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी धावलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यालाही दुखापत झाली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर परिसरात मोठी धावपळ उडाली. आरडाओरडा, मारहाण आणि गोंधळामुळे नागरिकांनी सुरक्षिततेसाठी श घरांचा आसरा घेतला. काही काळ संपूर्ण परिसरात दंगलसदृश वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र संतप्त झालेल्या दोन्ही गटांना आवरणे पोलिसांसाठीही मोठे आव्हान ठरले. परिस्थिती नियंत्रणात आणताना एका पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने त्यांना दुखापत झाली. जखमी पोलिस कर्मचाऱ्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर दोन्ही गटांतील अनेकांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून हाणामारीमागील नेमके कारण, यात सहभागी असलेले इतर संशयित आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू आहे.

घटनेनंतर शहरातील संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेने बारामती शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भरवस्तीत झालेल्या या हिंसक संघर्षामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास वेगाने सुरू आहे.

You may have missed

error: Content is protected !!