बारामतीत “अधिकमास समर शॉपिंग फेस्टिवल” ला उत्स्फूर्त प्रतिसाद
बारामती : ड्रिम्स डिझायनर्स फाऊंडेशन आयोजित “अधिकमास समर शॉपिंग फेस्टिवल २०२६” हा तीन दिवसीय भव्य शॉपिंग महोत्सव बारामती येथील श्री. विमलचंद्र जैन भवन, भिगवण रोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाला महिला वर्ग, कुटुंबिय तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शॉपिंग फेस्टिवलमध्ये साड्या, आकर्षक ज्वेलरी, होम डेकोरेशन साहित्य, ऑर्गेनिक उत्पादने तसेच Kids & Family Shopping Zone अशा विविध स्टॉल्सची रेलचेल पाहायला मिळाली. विविध प्रकारच्या दर्जेदार व आकर्षक वस्तूंमुळे ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. महिलांनी खरेदीचा मनमुराद आनंद घेतला.
महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या “मेरी आवाज सुनो” या सुरेल संगीत कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. तर “मायेची ओटी” या भावनिक स्पर्धेला महिलांकडून विशेष प्रतिसाद मिळाला. सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन निर्मला भुतडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून स्टॉलधारकांना शुभेच्छा दिल्या व उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रभावी आणि आकर्षक सूत्रसंचालन अश्विनीकुमार पत्की यांनी केले. मुख्य प्रायोजक म्हणून ॲटलान्स ग्रुप बारामती यांनी सहकार्य केले. तसेच सहप्रायोजक आणि मीडिया पार्टनर्स यांचे आयोजकांनी विशेष आभार मानले.
या यशस्वी आयोजनामागे ड्रिम्स डिझायनर्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीता पोटे यांचे नेतृत्व तसेच सचिव दर्शना जैन यांचे उत्कृष्ट नियोजन, व्यवस्थापन आणि परिश्रम यांचे मोलाचे योगदान राहिले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा महोत्सव बारामतीतील एक संस्मरणीय शॉपिंग आणि सांस्कृतिक पर्व ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
