May 27, 2026

“नदीत उडी… उसाच्या फडात लपला; पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला !”

IMG_20260527_121244

१५ गुन्ह्यांतील नॉन बेलेबल वॉरंटधारक सराईत आरोपी ‘पोक्या’ आडके अखेर जेरबंद; बारामती शहर पोलिसांची थरारक कारवाई

बारामती : अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला सातत्याने चकवा देत पोलिस आणि न्यायालयीन यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण करणारा सराईत फरार आरोपी शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके (रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे) याला अखेर बारामती शहर पोलिसांनी अत्यंत धाडसी, शिताफीपूर्ण आणि नियोजनबद्ध कारवाई करत जेरबंद केले आहे. तब्बल १५ गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते. या धडाकेबाज कारवाईमुळे बारामती परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विविध प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता; मात्र त्यानंतर आरोपीने न्यायालयीन प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक पळ काढत सुनावण्यांना गैरहजर राहण्यास सुरुवात केली. न्यायालयाकडून वारंवार समन्स, नोटिसा आणि वॉरंट बजावण्यात येऊनही तो हजर राहत नसल्याने अखेर त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आले होते.

फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी बारामती शहर पोलीस सातत्याने प्रयत्न करत होते. अखेर दि. २४ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे सातच्या सुमारास पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शंकर उर्फ पोक्या आडके हा दशविधी कार्यक्रमासाठी आपल्या मूळ गावी आला आहे. माहिती मिळताच पोलिस हवालदार टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे आणि पोलीस शिपाई वैभव मदने यांनी तत्काळ पथक तयार करून घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने थरारक पद्धतीने पळ काढण्यास सुरुवात केली. अटक टाळण्यासाठी त्याने थेट करा नदीच्या उंच भिंतीवरून नदीत उडी घेतली. मात्र पोलिसांनीही कोणतीही भीती न बाळगता त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. नदीतून पळत गेलेला आरोपी काही वेळात नदीकाठची भिंत चढून जवळील दाट उसाच्या फडात लपला. उंच उसाचे पीक, अरुंद पायवाटा आणि शांत परिसर यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते.

तरीही “गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्यापासून कायम लपून राहू शकत नाही,” हा निर्धार ठेवून पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संपूर्ण परिसरात कसून शोधमोहीम सुरू ठेवली. जवळपास दीड तास चाललेल्या या थरारक शोधमोहीमेनंतर उसामध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण परिसराला घेराव घालत अत्यंत शिताफीने आरोपीला पकडून ताब्यात घेतले. अनेक वर्षांपासून पोलिसांना आणि न्यायालयाला चकवा देणारा आरोपी अखेर बारामती शहर पोलिसांसमोर निष्प्रभ ठरला.

सदर आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास येरवडा कारागृह, पुणे येथे न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून त्याची रवानगी करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे न्यायालयीन प्रक्रियेपासून पळून जाणाऱ्या तसेच वारंवार कायद्याला आव्हान देणाऱ्या आरोपींना स्पष्ट संदेश मिळाला आहे. नदी, शेत, अंधार किंवा कोणतेही लपण्याचे ठिकाण गुन्हेगाराला वाचवू शकत नाही, कारण कायद्याचा हात अधिक मजबूत आणि वेगवान असल्याचे बारामती शहर पोलिसांनी पुन्हा सिद्ध केले आहे.

सदर कारवाईमध्ये न्यायालयीन कागदपत्रे, वॉरंट अंमलबजावणी आणि आरोपीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात महिला पोलीस हवालदार सगुना आवटे व पोलीस हवालदार उमा कोकरे यांचाही मोलाचा सहभाग राहिला.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई वैभव मदने, महिला पोलीस हवालदार सगुना आवटे, पोलीस हवालदार उमा कोकरे, हवालदार उदय टापरे आणि बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

You may have missed

error: Content is protected !!