May 26, 2026

शासकीय नोकरीच्या आमिषाने १ कोटी ३६ लाखांची फसवणूक; टोळीतील आरोपी जेरबंद

IMG-20260526-WA0090

बारामती : शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींसह अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीवर बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. बनावट नियुक्तीपत्रे देऊन तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ ते ४ मे २०२५ या कालावधीत तांदुळवाडी (ता. बारामती) येथील महिला हॉस्पिटल तसेच मळद परिसरात आरोपी अनिकेत धनंजय पाठक याने “गट-क अधिपरिचारिका” पदावर शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. महिला हॉस्पिटलमधील स्टाफ नर्स व इतरांची ओळख करून घेत आरोपींनी विश्वास संपादन केला.

यानंतर अजिंक्य पाठक, सिओना साळवे उर्फ सिओना अनिकेत पाठक, सुधाकर सोळंकी, सागर गायकवाड आणि सुरज तिमय्या असदकर यांच्या मदतीने फिर्यादी व साक्षीदारांकडून वेळोवेळी ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपये उकळण्यात आले. विशेष म्हणजे, विश्वास बसावा यासाठी आरोपींकडून बनावट नियुक्तीपत्रेही देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी मिळाली नसल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात मार्च २०२६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी सुरज तिमय्या असदकर (वय ३९, व्यवसाय डिलिव्हरी बॉय, रा. पडवळ आळी, गोखले हॉलजवळ, चिंचवडगाव, ता. हवेली, जि. पुणे) हा पत्नीला भेटण्यासाठी घरी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आर्थिक फायद्यासाठी संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने आरोपीस सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यापूर्वी या प्रकरणात अजिंक्य पाठक (रा. दौंड) आणि सुधाकर सोळंकी (रा. येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार तसेच पोलीस अंमलदार सागर देशमाने, जितेंद्र शिंदे आणि विठ्ठल तरंगे यांनी केली.

You may have missed

error: Content is protected !!