May 26, 2026

“अठरा वर्षांची माया की अवैध साम्राज्य?” बारामतीतील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याच्या काळ्या कारभाराचे धक्कादायक पुरावे केसरीच्या हाती

police-constable-bribe

बारामती  : बारामती शहरात गेल्या तब्बल अठरा वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कथित अवैध वसुली साम्राज्याची पोलखोल करणारी बातमी प्रसिद्ध होताच अनेक त्रस्त नागरिकांनी “द केसरी”शी संपर्क साधत धक्कादायक माहिती उघड करण्यास सुरुवात केली आहे. कुणी ऑडिओ रेकॉर्डिंग, कुणी व्हिडिओ, तर कुणी थेट व्यवहारांचे पुरावे समोर आणत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

शहरासह तालुक्यातील अवैध धंद्यांचे जाळे एका विशिष्ट कर्मचाऱ्याच्या आशीर्वादानेच चालत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. बारामतीतील भंगार दुकाने, मुरूम वाहतूक, बेकायदा हायवा वाळू पॉईंट, गुटखा विक्री, गुटखा होलसेलर, वाहतूकदार, बेकायदा रेशन दुकानदार, गॅस रिफिलिंग करणारे, पानटपऱ्या, परमिट रूम, बिअर बार, वाईन शॉप, मटका, चक्री जुगार तसेच हातभट्टीच्या धंद्यांपर्यंत या कथित वसुलीचे चक्र पोहोचल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे, या अवैध साम्राज्याला चालना देण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने स्वतंत्र जाळे निर्माण केल्याची माहिती समोर येत आहे. हातभट्टी व्यवसायातून होणारी कथित वसुली गोळा करून ती संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवणारा मध्यस्थदेखील “द केसरी”शी चर्चा करण्यास तयार झाल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लहान टपरीवाल्यापासून मोठ्या अवैध धंदेवाल्यांपर्यंत अनेकांना संरक्षण देत त्यांच्याकडून नियमित वसुली केली जात असल्याचे आरोप होत आहेत. “धंदा सुरू ठेवायचा असेल तर ठरलेली माया द्यावीच लागते,” असा दावा काही व्यावसायिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणातील पुरावे, व्यवहारांची साखळी आणि संबंधितांची नावे समोर आणण्यासाठी “द केसरी”कडून स्वतंत्र तपास सुरू असून, आगामी भागांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

You may have missed

error: Content is protected !!