बारामतीची माया की मायाजाल?” अठरा वर्षांपासून एकाच परिसरात ठाण मांडून बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपत्तीचा होणार ‘द केसरी’तून पोलखोल
बारामती : बारामती शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याची सध्या पोलीस वर्तुळासह शहरभर जोरदार चर्चा सुरू असून, गेल्या तब्बल अठरा वर्षांपासून हा कर्मचारी बारामती परिसरातून बाहेरच गेला नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यानच्या काळात बारामती शहर, इंदापूर, भिगवण आदी ठिकाणी कागदोपत्री बदली झाल्याचे दाखवले गेले, मात्र प्रत्यक्षातील वसुली, संपर्क आणि कथित बेकायदा नियुक्तीचे जाळे मात्र बारामतीतच कायम असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
“बारामतीची माया” इतकी वाढली की अठरा वर्षांत शहर सोडण्याची वेळच आली नाही, अशी उपरोधिक टीका आता नागरिकांमधून होत आहे. वारंवार बदलीची प्रक्रिया होऊनही संबंधित कर्मचाऱ्याने विविध माध्यमातून बारामतीतच आपले बस्तान कायम ठेवल्याचे बोलले जात असून, यामागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत, याबाबतही चर्चा रंगू लागली आहे.
सामान्य पगारात एवढी संपत्ती कशी?
संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता उभी केल्याची माहिती समोर येत आहे. शहरात स्वतःचे घर, शहरालगत आणखी एक आलिशान वास्तू, दारात दोन चारचाकी व तब्बल पाच दुचाकी वाहने असा थाट असल्याची चर्चा असून, एवढी संपत्ती नेमकी कोणत्या उत्पन्नातून उभी राहिली, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पोलीस विभागातील सामान्य कर्मचाऱ्याच्या पगाराच्या तुलनेत ही संपत्ती संशयास्पद वाटत असल्याने, “ही माया नेमकी कुठून आली?” असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. काही मालमत्ता व्यवहार नातेवाईकांच्या नावावर झाल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, शहराबाहेरही संबंधित कर्मचाऱ्याची गुंतवणूक असल्याची माहिती समोर येत आहे.
बदली झाली; पण ‘व्यवस्था’ बारामतीतच?
विशेष म्हणजे, मागील अठरा वर्षांत संबंधित कर्मचाऱ्याच्या विविध ठिकाणी बदलीचे आदेश झाल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात त्याचे कार्यक्षेत्र, संपर्क आणि कथित वसुलीचे जाळे बारामतीतूनच सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बदली प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिली का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
स्थानिक पातळीवर काही संवेदनशील प्रकरणांमध्ये या कर्मचाऱ्याचे नाव चर्चेत आल्याचेही सांगितले जात असून, अनेक व्यवहारांमध्ये त्याची अनधिकृत भूमिका असल्याच्या चर्चा पोलीस विभागातच रंगताना दिसत आहेत.
द केसरी’तून होणार क्रमशः पोलखोल
दरम्यान, “द केसरी” पोर्टलच्या माध्यमातून या पोलीस कर्मचाऱ्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा क्रमशः पोलखोल केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील आणि शहराबाहेरील मालमत्ता, वाहनांची नोंद, आर्थिक व्यवहार, सेवाकाळातील उत्पन्नाचे गणित, नातेवाईकांच्या नावावरील मालमत्ता तसेच कथित वसुलीचे धागेदोरे यावर आधारित विशेष मालिका प्रसिद्ध केली जाणार असल्याचे समजते.
यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली असून, संबंधित कर्मचाऱ्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
“बारामतीची माया की मायाजाल?”
अठरा वर्षांत विविध ठिकाणी बदली; तरी कार्यक्षेत्र बारामतीतच?
शहरात दोन घरे, अनेक वाहने असल्याची चर्चा नातेवाईकांच्या नावावर मालमत्ता व्यवहार? “द केसरी”तून क्रमशः होणार संपत्तीचा खुलासा वरिष्ठ चौकशीची नागरिकांकडून मागणी
