July 17, 2026

विद्यार्थी अकॅडमीत, हजेरी शाळेत; बारामती पॅटर्नवर प्रश्न?

IMG_20260517_201243

बारामती : बारामती शहर आणि परिसरात वाढीव तुकड्या, अनधिकृत पटसंख्या तसेच नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या शिक्षण संस्था आणि अकॅडमींच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते भास्कर दामोदरे यांनी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. अनेक संस्था शासनाची अधिकृत मान्यता नसताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

दामोदरे यांनी ‘द केसरी’शी बोलताना सांगितले की, काही शिक्षण संस्थांमध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प असते. मात्र विद्यार्थ्यांना अकॅडमीमध्ये बसवून त्या विद्यार्थ्यांच्या नावावर शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची पटसंख्या वाढवली जाते. शासनाच्या नियमांना हरताळ फासत या माध्यमातून शिक्षणाचा मोठा बाजार उभा करण्यात आला आहे.

बारामतीमध्ये अनेक ठिकाणी शाळांच्या नावाखाली अकॅडमी चालवल्या जात असून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात आहे. मात्र या संस्था चालवताना आवश्यक परवानग्या, शिक्षकांची संख्या, वर्गखोल्या, सुरक्षा व्यवस्था आणि शैक्षणिक निकष यांचे पालन केले जात नसल्याचा आरोप दामोदरे यांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असून पालकांचीही आर्थिक फसवणूक होत असल्याचे त्यांनी म्हटले.

याचबरोबर बारामती नगरपालिकेच्या कामकाजावरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फायर ऑडिट करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले. नियमाप्रमाणे बांधकाम सुरू असताना आणि पूर्ण होण्यापूर्वी आवश्यक तपासण्या होणे अपेक्षित असताना संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नगरपालिकेचे तात्कालिक नगररचना अधिकारी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांच्या आणि फायर ऑफिसर यांच्या भूमिकेची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणीही दामोदरे  करणार आहेत. शिक्षण संस्थांना नियमबाह्य पद्धतीने संरक्षण देण्यात आले का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

बारामतीमध्ये गेल्या काही वर्षांत अकॅडमी संस्कृती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दहावी-बारावीच्या निकालांच्या स्पर्धेत अनेक संस्था विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या जाहिराती करत आहेत. मात्र त्यामागे नियमबाह्य कारभार आणि शिक्षणाचे व्यापारीकरण वाढत असल्याची टीका आता उघडपणे होऊ लागली आहे.

भास्कर दामोदरे यांच्या या भूमिकेमुळे बारामतीतील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, बेकायदेशीर शिक्षण संस्था आणि अकॅडमींच्या कारभारावर आता न्यायालयीन पडदा उघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित ‘शिक्षण बाजारावर मोठी कारवाई होण्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

 काही काळ वाचकांना अकॅडमीच्या बातम्या पुरवू शकलो नाही. मात्र आता नव्या जोमाने बारामतीत सुरू असलेला हा कथित गोरखधंदा कायदेशीर चव्हाट्यावर आणला जाणार !

आवाहन

ज्या पालकांना बेकायदेशीर सुरू असलेल्या अकॅडमी व शिक्षण संस्थांमुळे मानसिक, शैक्षणिक किंवा आर्थिक मनस्ताप सहन
करावा लागला आहे, त्यांनी सामाजिक कार्यकर्ते भास्कर दामोदरे यांच्याशी 8600558030 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

You may have missed

error: Content is protected !!