डमी पिस्तुलाचा धाक दाखवून बारामतीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न!
बारामती : बारामती शहरात डमी पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील जलतरण तलाव परिसरात सकाळच्या सुमारास घंटागाडीवरील एका तरुणाच्या डोक्याला डमी पिस्तूल लावून धमकावण्याचा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी मदने (रा. भीमरत्न नगर, बारामती) याच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात संबंधित पिस्तूल हे गोळीबार करणारे खरे पिस्तूल नसून केवळ आवाज करणारे डमी पिस्तूल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पूर्ववैमनस्यातून फिर्यादीच्या डोक्याला डमी पिस्तूल लावल्याचे संबंधित आरोपीने पोलिसांना सांगितल्याची माहिती मिळत आहे. मात्र, डमी पिस्तूल असले तरी त्याचा वापर करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न गंभीर मानला जात आहे.
