November 3, 2026

एका मॉलमुळे संपूर्ण गावाला वेठीस धरणे योग्य आहे का? आरएस ब्रदर्स मॉलमुळे भिगवण रोडवरील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर?

IMG_20261103_192701

बारामती : एका शोरूमने संपूर्ण गावाला वेठीस धरणे योग्य आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बारामतीत नव्याने सुरू झालेल्या आरएस ब्रदर्स या मॉलमुळे भिगवण रोडवरील वाहतुक व्यवस्था ऐरणीवर असून, विमलनाथ चौक, सम्यक चौक आणि सातव चौक या परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.

आरएस ब्रदर्स मॉल सुरू झाल्यापासून दररोज म्युझिक सिस्टीम लावली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर धार्मिक देवदेवतांच्या प्रतिकृती उभ्या करून त्यांना नाचविले जात असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष स्पीकर आणि या प्रतिकृतींकडे वेधले जात आहे. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, या मॉलच्या शेजारीच न्यायालयाचा परिसर असल्याने ध्वनिक्षेपकाच्या आवाजाबाबतही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मॉल चालकाकडून ध्वनिक्षेपक आणि वाहतुकीसंदर्भातील शासनाच्या नियमावलीचे पालन केले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एका बाजूला शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे एका मॉलमुळे तीन चौकांतील वाहतुकीवर परिणाम होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान, संबंधित मॉल चालकाविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी समाजातील काही युवक करणार असल्याचे नागरिकांनी बोलताना सांगितले. त्यामुळे आता नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि वाहतूक शाखा या प्रकरणात काय भूमिका घेणार, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!