दुष्काळी बारामतीत शेतकरी चिंतेत; खरेदी-विक्री संघाच्या संचालकांची काश्मीर ट्रिप चर्चेत!
बारामती : राज्यासह बारामती तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, राज्य सरकारने बारामतीचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश केला आहे. पावसाअभावी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत असताना, अन्नदाता शेतकरी चिंतेत आहे. अशा परिस्थितीत बारामती खरेदी-विक्री संघाच्या संचालकांची काश्मीर ट्रिप चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच या ट्रिपमध्ये तालुका अध्यक्षांचा सहभाग असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातील चौकाचौकांत यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.
एकीकडे शेतकऱ्यांना पाण्याची चिंता सतावत आहे. पाऊस लांबल्याने पिकांचे काय होणार, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था कशी करायची आणि आगामी काळात पाण्याचे नियोजन कसे करायचे, असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. अशा वेळी सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची काश्मीर ट्रिप आयोजित करण्यात आली, त्याचा खर्च कोणत्या निधीतून केला जात आहे आणि या ट्रिपचा खर्च कारखान्याच्या निवडणुकीत मिळालेल्या वाटपातून शिलकीतला बोनस आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी गायक आणि कलाकारांच्या वाहनांचा, स्पीकरचा वापर करण्यात आला आहे. निवडणूक संपली, पॅनल निवडून आले; मात्र प्रचारासाठी मेहनत घेणाऱ्या कलाकारांना अद्याप त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नसल्याने पक्षाविषयी संताप आणि रोष व्यक्त केला जात आहे.
मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कलाकारांना आपल्या कष्टाचे पैसे मिळावेत, यासाठी पक्ष कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असल्याचे नित्याचे निदर्शनास येत आहे. निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी कलाकारांची मदत घेतली जाते; मात्र निवडणूक संपल्यानंतर त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत असेल, तर ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत प्रतिष्ठेचा विषय बनवून प्रचार करण्यात आला. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कलाकारांनी या प्रचारात सहभाग घेतला. मात्र, निवडणुकीनंतर कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न प्रलंबित असल्याच्या चर्चेमुळे संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दुसरीकडे, दुष्काळी परिस्थितीत सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची काश्मीर ट्रिप आणि कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न या दोन बाबींची सांगड घालत नागरिकांकडून चर्चा केली जात आहे.
शेतकरी पाण्याच्या चिंतेत, कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत आणि पदाधिकारी काश्मीर ट्रिपवर, असे चित्र निर्माण झाले असेल तर त्याबाबत संबंधितांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.
एकीकडे शेतकऱ्यांच्या अडचणी, दुसरीकडे प्रचारासाठी मेहनत घेणाऱ्या कलाकारांचे मानधन आणि त्याच वेळी पदाधिकाऱ्यांचा पर्यटन ट्रिप या मुद्द्यांमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
आता संबंधित सहकारी संस्थेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष या प्रश्नांवर काय भूमिका मांडतात, तसेच कलाकारांचे थकीत मानधन कधी मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
