घरातील खोलीत रक्तरंजित थरार; ३० वर्षीय महिलेचा खून
बारामती : बारामती तालुक्यातील पणदरे येथे घरातील झोपण्याच्या खोलीत ३० वर्षीय महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना १२ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. डोक्यात व चेहऱ्यावर अज्ञात हत्याराने मारहाण केल्यानंतर टॉवेलने गळा आवळून महिलेचा जीव घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेने पणदरे परिसरात खळबळ उडाली आहे.
वैशाली तानाजी पवार (वय ३०, रा. पणदरे, ता. बारामती) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची सासू रंजना पवार (वय ५०) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्यापूर्वी पणदरे गावच्या हद्दीतील पवार यांच्या राहत्या घरातील झोपण्याच्या खोलीत वैशाली पवार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. अज्ञात कारणातून झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर अज्ञात हत्याराने वार करण्यात आले. त्यानंतर टॉवेलच्या सहाय्याने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे फिरवली आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेवर हल्ला करणारा आरोपी कोण? खुनामागील नेमके कारण काय? तसेच हा हल्ला कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ पुढील तपास करीत आहेत.
