September 9, 2026

सात लाखांची लाच मागितली; दोन लाख घेतले, पाच लाख घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात!

IMG_20260909_124956

कारवाईची भीती दाखवून तक्रारदाराकडे लाचेची मागणी; बारामती तालुका पोलिस ठाण्यातील महेश उगले रंगेहात पकडला
भिगवणहून नुकतीच बदली; पोलिस दलातील संशयास्पद बदल्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह

बारामती : पोलिस कारवाईची भीती दाखवत तक्रारदाराकडून तब्बल सात लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आणि त्यापैकी दोन लाख रुपये यापूर्वीच स्वीकारल्याचे निष्पन्न झालेल्या पोलिस हवालदाराला उर्वरित पाच लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. महेश अंकुश उगले (वय ३६, पोलीस हवालदार, ब. नं. २६३७) असे कारवाई झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे बारामती पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्या पत्नी झुंबा डान्स क्लास आणि जिम चालवितात. या क्लासमुळे नागरिक त्रस्त होत असल्याच्या तक्रारीवरून तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरोधात कारवाई करण्यासाठीचा अर्ज पोलिसांकडे चौकशीसाठी आला होता. याच अर्जाचा आधार घेत संबंधितांवर पोलिस कारवाई होऊ शकते, अशी भीती दाखवत हवालदार महेश उगले यांनी तक्रारदाराकडे सात लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

या मागणीबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान यापूर्वी दोन लाख रुपये स्वीकारल्याचे उगले यांनी पंचांसमक्ष मान्य केल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाले. तसेच उर्वरित पाच लाख रुपये स्वीकारण्यास त्यांनी सहमती दर्शवली.

यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ८ सप्टेंबर रोजी माळेगाव रोडवरील पी.डी.सी.सी. बँकेजवळ उर्वरित पाच लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना दुपारी ३.०२ वाजता एसीबीच्या पथकाने महेश उगले यांना रंगेहात पकडले.

पोलिस दलातील बदल्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह

विशेष म्हणजे, संबंधित हवालदार काही दिवसांपूर्वीच इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून बारामती तालुका पोलिस ठाण्यात बदली होऊन आला होता. पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत यापूर्वीच स्थानिक पातळीवर विविध प्रश्न उपस्थित झाले होते. काही कर्मचारी बदलीचे आदेश होऊनही नव्या ठिकाणी रुजू होत नसल्याच्या बाबीही चर्चेत होत्या.

या पार्श्वभूमीवर नुकताच बदली होऊन आलेला पोलिस कर्मचारी थेट सात लाखांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकणे हा पोलिस प्रशासनासाठी गंभीर धक्का मानला जात आहे. त्यामुळे पोलिस दलातील बदल्या, नियुक्त्या आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कारवाईच्या भीती’चा धाक दाखवून वसुली?

नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची चौकशी करणे आणि कायद्यानुसार कारवाई करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. मात्र, याच कारवाईची भीती दाखवून लाखो रुपयांची मागणी होत असल्याचे प्रकरण समोर आल्याने पोलिस अधिकाराचा वापर वसुलीसाठी होत आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
एका प्रकरणात सात लाखांची मागणी, त्यातील दोन लाखांची स्वीकारलेली रक्कम आणि उर्वरित पाच लाख स्वीकारताना झालेली एसीबीची कारवाई यामुळे बारामती पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने सापळा यशस्वी केला.

बदल्यांवर प्रश्न, आता लाचेच्या सापळ्याने प्रशासन हादरले!

भिगवणहून बारामतीत बदली होऊन आलेल्या हवालदारावर एसीबीची कारवाई संबंधित हवालदार महेश उगले यांची काही दिवसांपूर्वीच इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून बारामती तालुका पोलिस ठाण्यात बदली झाली होती. पोलिस दलातील बदल्यांबाबत यापूर्वीपासूनच अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. काही कर्मचारी बदली होऊनही बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली होती.

आता बदली होऊन आलेल्या याच कर्मचाऱ्यांपैकी एकावर सात लाखांच्या लाचेच्या मागणीचा आरोप आणि पाच लाखांची लाच स्वीकारताना एसीबीची कारवाई झाल्याने या संपूर्ण बदली प्रक्रियेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बदल्या नेमक्या कोणत्या निकषांवर झाल्या? बदलीनंतर कोणत्या कर्मचाऱ्यांना कुठे नियुक्त केले गेले? काही कर्मचाऱ्यांना संवेदनशील ठिकाणीच का संधी मिळते? या प्रश्नांची उत्तरे आता पोलिस प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.

बारामतीत पोलिस दलातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या घोषणा होत असताना, प्रत्यक्षात पोलिस कर्मचाऱ्यांवरच लाखो रुपयांच्या लाचेच्या प्रकरणात एसीबीची कारवाई होत असेल, तर ‘पोलिस प्रशासन लाचेच्या गर्दीत किती अडकले आहे?’ हा प्रश्न गंभीरपणे विचारण्याची वेळ आली आहे.

error: Content is protected !!