October 19, 2026

“मॅनेज केलंय सगळं” म्हणत बदलीच्या आदेशाला केराची टोपली? प्रामाणिक पोलिसांच्या प्रतिमेलाही बसतोय फटका

IMG_20260902_183637

बारामती : पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा प्रशासकीय प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, बदलीचे आदेश झाल्यानंतरही काही कर्मचारी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर न होता जुन्याच ठिकाणी ठाण मांडून बसत असल्याची चर्चा बारामती उपविभागात सुरू आहे. विशेष म्हणजे, बदलीच्या ठिकाणी जाण्याऐवजी जुन्याच कार्यक्षेत्रात राहून कथितपणे ‘वसुली’ सुरू असल्याचे आरोप नागरिकांमधून होत आहेत.

“बदली झाली आहे, मग नवीन ठिकाणी का जात नाही?” असा सवाल आता नागरिकांसह पोलीस दलातीलच काही कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. काही कर्मचाऱ्यांकडून “सगळं मॅनेज केलंय” अशी भाषा वापरली जात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे बदली आदेशांची अंमलबजावणी नेमकी कितपत होते, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बारामती उपविभागातील काही पोलीस ठाण्यांमध्ये ग्रेड पीएसआय, हवालदार तसेच पोलीस कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याची चर्चा आहे. बदलीचे आदेश झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यमुक्त करून त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयीन यंत्रणेची आहे. मात्र, प्रत्यक्षात काही कर्मचारी जुन्याच ठिकाणी राहात असल्यास त्यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘खाऊ’ प्रवृत्तीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांवरही संशय

पोलीस दलामध्ये अनेक अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. मात्र, काही कर्मचाऱ्यांवर होणारे वसुलीचे आरोप संपूर्ण पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवतात. काहींच्या कथित भ्रष्ट आचरणामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांकडेही संशयाने पाहिले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहिल्याने स्थानिक पातळीवर निर्माण झालेले संबंध, व्यावसायिक हितसंबंध आणि दबावगट यामुळे बदलीनंतरही संबंधित कर्मचारी जुन्या ठिकाणीच राहण्याचा प्रयत्न करतात का, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणे गरजेचे आहे.

बदली आदेशाची अंमलबजावणी होणार कधी?

बदली झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करून नवीन ठिकाणी रुजू करणे हा प्रशासकीय शिस्तीचा भाग आहे. त्यामुळे “बदली झाली आहे, तर बदलीच्या ठिकाणी जा” अशी स्पष्ट भूमिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे.

बारामती उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ज्या पोलीस ठाण्यांमध्ये बदली झालेले कर्मचारी अद्यापही जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याची चर्चा आहे, त्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून प्रत्यक्ष कार्यमुक्तीची तारीख, नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजेरी आणि सध्याची नियुक्ती याची पडताळणी करण्याची मागणी होत आहे.

“पोट भरलं असेल तर आपापल्या जागेवर जा!”

पोलीस दलाची प्रतिमा ही काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर अवलंबून नसली तरी भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पदाचा गैरवापर, वसुलीचे आरोप आणि बदलीनंतरही जुन्याच ठिकाणी राहण्याची प्रवृत्ती यामुळे पोलीस प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास कमी होऊ शकतो.
त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता बदली आदेशांची कठोर अंमलबजावणी करावी, संबंधितांना तातडीने कार्यमुक्त करावे आणि वसुलीचे आरोप असल्यास स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“पोट भरलं असेल तर जावा ना आपापल्या जागेवर!” असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You may have missed

error: Content is protected !!