बारामतीत आई-मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; घटनेने खळबळ
बारामती : तांदुळवाडी येथील दादा पाटील नगरमध्ये एका आईसह तिच्या मुलाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा पती विजय गावडे गुरुवारी रात्री सुमारे सात वाजता कंपनीत ड्युटीसाठी गेले होते. शुक्रवारी सकाळी घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने प्रथम हॉलच्या खिडकीची काच उघडून पाहण्यात आले. त्यानंतर स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाहिले असता मुलगा विवेक गावडे वय १७ वर्षे याने गळफास घेतल्याचे, तर आई रमा गावडे वय ४४ वर्षीय खाली मृतावस्थेत पडलेली असल्याचे दिसून आले.
यानंतर शेजारी राहणाऱे यांच्या मदतीने घराचा आतून बंद असलेला दरवाजा बाहेरून तोडून पोलीस व कुटुंबीयांनी घरात प्रवेश केला. मुलाने पत्र्याच्या आडुला गळफास घेतल्याचे आढळून आले, तर आई बाजूला मृतावस्थेत पडलेली होती. तिच्या गळ्यावर दोरीसदृश वस्तूचा व्रण असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम तसेच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुधीर काळे प्राथमिक तपास करीत आहेत. आई आणि मुलाने आत्महत्या का केली, यामागे नेमके कारण काय आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
