बहुजन समाज पार्टीच्या बारामती विधानसभा कमिटी कार्यकारिणी जाहीर
बारामती : बहुजन समाज पार्टीच्या बारामती विधानसभा कमिटीची नव्याने घोषणा करण्यात आली असून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडी बहुजन समाज पार्टीचे राज्य महासचिव काळूराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
नव्या कार्यकारिणीत संदीप खांडेकर यांची विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यमान अध्यक्ष दयानंद पिसाळ यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत त्यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. विशाल घोरपडे यांची उपाध्यक्ष, इसाक पठाण यांची महासचिव, प्रवीण शिंदे यांची सचिव, रोहित जगताप यांची कोषाध्यक्ष तर विकी बनसोडे यांची बी.व्ही.एफ. पदावर निवड करण्यात आली आहे.
यावेळी पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी सातत्याने कार्यरत असलेले बहुजन समाज पार्टीचे बारामती शहराध्यक्ष भास्कर दामोदरे यांच्या योगदानाचाही विशेष उल्लेख करण्यात आला. पक्ष विस्तार, सदस्य नोंदणी मोहीम आणि सामाजिक प्रश्नांवर पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कार्यकर्त्यांनी कौतुक केले.
बैठकीदरम्यान पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचविणे, बहुजन समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदन करण्यात आले.
बारामती विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद वाढविणे, संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि सामाजिक व राजकीय स्तरावर बहुजन समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे यासाठी ही नवी कार्यकारिणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे असा विश्वास बारामती बहुजन समाज पार्टीचे महासचिव चौधरी यांनी व्यक्त केला.
