June 17, 2026

भागीदारीतून वाद अन् फौजदारी गुन्ह्यापर्यंत मजल; बारामतीतील सीएविरुद्ध 47 लाखांच्या फसवणुकीचा आरोप

file_0000000013bc7206a4e6c5b1a7a8c187

बारामती : चार्टर्ड अकाउंटंट व्यवसायातील भागीदारीतून सुरू झालेला वाद अखेर फौजदारी गुन्ह्यापर्यंत पोहोचला असून, बारामती शहर पोलीस ठाण्यात एका चार्टर्ड अकाउंटंटविरुद्ध आर्थिक फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रांची निर्मिती आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.

पंढरपूर येथील ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट संजीव शरदचंद्र कोठाडिया (वय 69) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, बारामतीतील प्रतिक जीवन दोशी (वय 39) यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

फिर्यादीनुसार, दोघांनी मिळून “संजीव कोठाडिया व प्रतिक दोशी अँड कंपनी” या नावाने भागीदारीत सीए फर्म सुरू केली होती. या फर्मच्या माध्यमातून आयसीएआय नोंदणी, जीएसटी नोंदणी, बँक व्यवहार, कार्यालयीन कामकाज, आयकर विवरणपत्रे आणि इतर आर्थिक व्यवहार करण्यात आले. मात्र, अनेक वर्षे फर्मचा लाभ घेतल्यानंतर आरोपीने भागीदारीतील आर्थिक हिशेब देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, भागीदारीच्या हिशेबानुसार त्यांना 47 लाख 66 हजार 783 रुपये 91 पैसे इतकी रक्कम मिळणे अपेक्षित होते. परंतु फर्म नोंदणीकृत नसल्याचे कारण पुढे करत आरोपीने ही रक्कम देण्यास नकार दिला. यासाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून दिशाभूल करण्यात आल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.

दरम्यान, 15 एप्रिल रोजी दोघांमध्ये तडजोडीचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यावेळी आरोपीने कोणतीही रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर “कोर्टात जा, मला काही फरक पडत नाही” असे म्हणत फिर्यादीला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीत आरोपीने अपघाताचा बनाव करून संपविण्याची तसेच शस्त्राचा वापर करण्याची धमकी दिल्याचा उल्लेख आहे.

या प्रकरणाची दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, बारामती यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिते अंतर्गत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक व्यवहार, भागीदारी हक्क आणि धमकीच्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाची शहरात चर्चा सुरू झाली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत करीत आहेत.

error: Content is protected !!