माळेगाव पोलिसांची कारवाई; गावठी पिस्टल, जिवंत काडतूस व कुकरीसह दोघांना अटक
बारामती : माळेगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या धाडसी कारवाईत गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, धारदार कुकरी चाकू आणि चारचाकी वाहन असा तब्बल ३ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे बारामती तालुक्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे.
माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना मौजे कऱ्हावागज येथील गणेश तात्याराम गावडे (वय २०) हा गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जवळ बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.
पोलीस पथकाने कऱ्हावागज परिसरात शोधमोहीम राबविली असता आरोपी माळेगाव खुर्द हद्दीतील माळेगाव-कऱ्हावागज रस्त्यावरील तुकाई चौकाजवळील बंद पत्राशेडसमोर चारचाकी वाहनात बसलेला असल्याची माहिती मिळाली. रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलीस जवळ येताच त्याने वाहन सुरू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत वाहन अडवून त्याला ताब्यात घेतले.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्टल आढळून आले. तसेच मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतूस सापडले. वाहनाची तपासणी केली असता चालकाच्या सीटखाली धारदार कुकरी चाकूही जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान गणेश गावडे याने जप्त करण्यात आलेले पिस्टल व काडतूस हे मयूर विष्णू मोरे (रा. मेडद, ता. बारामती) याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मयूर मोरे यालाही ताब्यात घेतले असून दोघांविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी हे शस्त्र कोणत्या उद्देशाने खरेदी केले होते, त्यांना ते नेमके कोणाकडून मिळाले आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास माळेगाव पोलीस करत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे आणि जयसिंग कचरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
